गुरुवारपासून ४९१ ग्रामपंचायतींमध्ये ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम!
By संतोष वानखडे | Published: September 13, 2022 02:12 PM2022-09-13T14:12:40+5:302022-09-13T14:12:40+5:30
गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम राबविण्यात येणार आहे.
वाशिम :
गाव स्वच्छ व सुंदर बनविण्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील ४९१ ग्रामपंचायतींमध्ये १५ सप्टेंबरपासून ‘स्वच्छता ही सेवा’ मोहिम राबविण्यात येणार आहे. या दरम्यान सर्वांनी गावाच्या दृष्यमान स्वच्छतेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी मंगळवारी (दि.१३) केले.
१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२२ या कालावधीत ‘स्वच्छता ही सेवा’ अंतर्गत गावांमध्ये दृष्यमान स्वच्छतेसाठी एक राज्यव्यापी मोहीम राबविण्याबाबत केंद्र व राज्य शासनाकडून जिल्हा परिषद प्रशासनाला सूचना प्राप्त झालेल्या आहेत. यावर्षी ‘गावांची दृष्यमान स्वच्छता’ ही या मोहिमेची थीम ठरविण्यात आली आहे. गावांमध्ये ‘दृष्यमान स्वच्छता’ राखली जावी, यासाठी गावातील कचराकुंड्या व असुरक्षित ठिकाणांची साफसफाई करावी लागणार आहे. या मोहिमेदरम्यान गावातील सुका व ओला कचरा विलगीकरणासाठी व्यापक प्रमाणात जनजागृतीवर भर राहणार आहे. प्लास्टिक सारखा अविघटनशील कचरा एकत्रित करून त्याचे स्वतंत्र नियोजन करावे, पाणवठ्याजवळील परिसर स्वच्छ ठेवून त्याच्या सभोवताली वृक्षारोपण करणे, एकल प्लास्टिक वापराच्या (सिंगल युज प्लॅस्टिक) दुष्परिणामाबद्दल सभा आयोजित करून यापूर्वी अशा प्लास्टिक वापरावर बंदीबाबत घेतलेल्या ठरावाची अंमलबजावणी करणे, हागणदारीमुक्त अधिक घटकांवर सरपंच संवाद आयोजित करणे आदी उपक्रम राबविण्याच्या सूचना जिल्हा परिषद प्रशासनाने दिल्या.