प्रमुख पक्षांची स्वबळाची हाक!

By admin | Published: October 22, 2016 02:30 AM2016-10-22T02:30:03+5:302016-10-22T02:30:03+5:30

वाशिम जिल्ह्यातील नगर परिषद निवडणुकांच्या पृष्ठभूमीवर आघाड्या किंवा युतीबाबत अनिश्‍चितता असून इच्छुक उमेदवारही संभ्रमात आहे.

Swamiji's key words! | प्रमुख पक्षांची स्वबळाची हाक!

प्रमुख पक्षांची स्वबळाची हाक!

Next

वाशिम, दि. २१- जिल्ह्यातील तीनही नगर परिषदेच्या निवडणुकीत अद्याप प्रमुख पक्षांची युती अथवा आघाडी झाली नसून, प्रत्येकाने स्वबळाची तयारी चालविली आहे. प्रमुख पक्षांची युती अथवा आघाडी होणार की नाही, याबाबत इच्छुक उमेदवारही संभ्रमात असल्याचे दिसून येते.
जिल्ह्यातील वाशिम, कारंजा व मंगरुळपीर नगर परिषदेचा पाच वर्षांंंचा कार्यकाळ डिसेंबर २0१६ मध्ये संपणार असल्याने येत्या २७ नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानंतर प्रत्येक प्रमुख पक्षाने युती अथवा आघाडीकडे लक्ष न देता स्वबळावर इच्छुक उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. गत विधानसभा निवडणुकीत प्रत्येक पक्षाच्या युती-आघाडीतील घटस्फोटामुळे राजकीय समीकरणं पार बदलून गेली आहेत.
विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रत्येक प्रमुख राजकीय पक्ष स्वतंत्रपणे मैदानात उतरला होता. हाच धागा पकडून आता नगर परिषदेच्या निवडणुकीतही प्रमुख पक्ष स्वबळावर निवडणुकीची हाक देत असल्याने ह्यराजकारणह्ण चांगलेच तापले असल्याचे दिसून येते.
गत पंच वार्षिकमध्ये वाशिम नगर परिषदेवर आमदार राजेंद्र पाटणीप्रणित जिल्हा विकास आघाडी व राकाँ युती, मंगरुळपीर नगर परिषदेवर राष्ट्रवादी काँग्रेस आणि कारंजा नगर परिषदेवर भाजपाचे नरेंद्र गोलेच्छाप्रणित आघाडीची सत्ता होती. दरम्यानच्या काळात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्याने गतवेळची समीकरणे यावेळी पूर्णत: बदलली असल्याचे दिसून येते. बदललेली समीकरणे पाहता भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारिप-बमसं व स्थानिक आघाड्यांसाठी नगर परिषदेची निवडणूक मोठी कसरत ठरणारी आहे.
सर्वाधिक चुरस वाशिम नगर परिषद निवडणुकीत होण्याचा अंदाज वर्तविला जात असून, प्रमुख पक्षांनी इच्छुकांच्या चाचपणीचा सपाटा लावला आहे. वाशिम येथे नगराध्यक्ष पद खुल्या प्रवर्गासाठी आहे. येथे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपा व शिवसेना या चार प्रमुख पक्षांनी अद्याप युती अथवा आघाडीसाठी मित्रपक्षांशी बोलणी झाली नसल्याची माहिती आहे. स्वत:ची राजकीय शक्ती दाखवून देण्याच्या नावाखाली प्रत्येक पक्षाने जातीय समीकरण व एक गठ्ठा मतदानावर डोळा ठेवल्याचे दिसून येते. तीनही ठिकाणी उमेदवारांची चाचपणी प्रत्येक पक्षाकडून सुरू असल्याने, अद्याप कोणत्याही पक्षाने नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर केला नाही. विरोधकांपेक्षा स्वकीयाकडूनच ऐनवेळेवर जास्त दगाबाजी नको म्हणून अंतर्गत गटबाजी व असंतुष्टांवर प्रत्येकजण बारीक नजर ठेवून आहे. जिल्ह्यातील राजकीय स्थितीचा विचार केल्यास, येथे प्रत्येक पक्षाला कमी-अधिक प्रमाणात गटबाजीचा डाग लागल्याचे दिसून येते.
अंतर्गत गटबाजी शमविण्याबरोबरच असंतुष्टांना संतुष्ट करण्याची कसरत प्रमुख पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांना करावी लागणार आहे. प्रत्येक पक्ष स्वबळावर निवडणूक रिंगणात उतरला असल्याने चुरस निर्माण झाल्याचे दिसून येते. प्रत्येक पक्षाने स्वबळाची हाक दिल्याने इच्छुक उमेदवारही संभ्रमात असून, ऐनवेळी युती झाली, तर कुणाचे तिकीट कापले जाणार? या शक्यतेने इच्छुकांमध्ये तर्कवितर्क लढविले जात आहेत.

Web Title: Swamiji's key words!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.