मराठा आरक्षणासाठी मंगरूळपीर येथे लाक्षणिक उपोषण
By संतोष वानखडे | Published: November 1, 2023 05:32 PM2023-11-01T17:32:32+5:302023-11-01T17:33:27+5:30
मराठा समाजाच्यावतीने १ नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाक्षणिक उपोषणास प्रारंभ करण्यात आला.
वाशिम : मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र मिळावे, मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी जालना जिल्ह्यात उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ मंगरूळपीर येथील सकल मराठा समाजाच्यावतीने १ नोव्हेंबरपासून छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाक्षणिक उपोषणास प्रारंभ करण्यात आला.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे, या मागणीसाठी मनोज जरांगे-पाटील यांनी उभारलेल्या लढ्याला मराठा समाजाकडून मोठा पाठिंबा मिळत आहे. वाशिम जिल्ह्यातही मनोज जरांगे-पाटील यांच्या आमरण उपोषण आंदोलनाच्या समर्थनार्थ काही गावांत नेत्यांना गावबंदी असल्याचे फलक झळकले होते. वाशिम येथे ३० ऑक्टोबर रोजी अन्नत्याग सत्याग्रह आंदोलनही केले होते. मंगरूळपिरातही आंदोलन केले जात आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ १ नोव्हेंबरपासून शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात लाक्षणिक उपोषण सुरु करण्यात आले. या लाक्षणिक उपोषणाला शिवराज मित्र मंडळ, गुरुध्वज मित्र मंडळ, राम ठाकरे मित्र मंडळ, शिवसेना (उद्धव ठाकरे) शहर प्रमुख यांनी पाठिंबा दर्शविला. मोठ्या संख्येने या लाक्षणिक उपोषणात सहभागी होण्याचे आवाहन मंगरूळपीर तालुका सकल मराठा समाजाच्यावतीने करण्यात आले. यासंदर्भात सकल मराठा समाजाच्यावतीने तहसीलदार व ठाणेदारांना निवेदनही दिले. १ नोव्हेंबर रोजी प्रशासनाच्यावतीने तहसिलदार, ठाणेदार यांनी उपोषण स्थळी भेट दिली.