जिल्हाभरात सराफा व्यावसायिकांचा लाक्षणिक संप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:49+5:302021-08-24T04:45:49+5:30
शासनाच्या एचयूआयडी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने सोमवारी राज्यभर लाक्षणिक संप पुकारला होता. यात वाशिम जिल्ह्यातील ...
शासनाच्या एचयूआयडी कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र राज्य सराफ सुवर्णकार फेडरेशनने सोमवारी राज्यभर लाक्षणिक संप पुकारला होता. यात वाशिम जिल्ह्यातील सराफा व्यावसायिकांनी सहभागी होत कडकडीत बंद पाळतानाच जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. या निवेदनात असे नमूद आहे की, वाशिम जिल्ह्यातील संपूर्ण सुवर्णकार व सराफा व्यावसायिक अनेक पिढ्यांपासून सोने दागिन्यांचा व्यवसाय सचोटी व प्रामाणिकपणे करीत आहेत. नवीन तंत्रानुसार शासनाने लागू केलेल्या हॉलमार्किंगचे आम्ही स्वागत करून ते स्वीकारलेही आहे. तथापि, हॉलमार्किग कायद्याच्या व्यवस्थित अभ्यासाअभावी एचयूआयडी हा कायदा लागू केला आहे. हा कायदा आम्हाला अपराध्यांच्या कठड्यात उभा करीत असून, अनेक जाचक नियमांची तरतूद या कायद्यात आहे. त्यामुळे शासनाने सराफा व्यावसायिकांचा विचार करून हा कायदा रद्द करावा, या मागणीकडे आणि आमच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही २३ ऑगस्ट रोजी संपूर्ण सराफा बाजार लाक्षणिकदृष्ट्या बंद ठेवून शासनाच्या धोरणाचा निषेध व्यक्त करीत आहोत. निवेदनावर वाशिम सराफा व सुवर्णकार असोसिएशनचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव व सदस्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
----------
या आहेत संघटनेच्या मागण्या
दागिन्यांवरील हॉलमार्किंग विक्रीच्या ठिकाणी लागू असावे, नागरी स्वरूपाच्या गुन्ह्यासाठी नोंदणी रद्द करण्याची तरतूद उद्योगासाठी हानिकारक ठरू शकते, तसेच १० लाखांपर्यंत दंड, तुरुंगवास आणि परवाना रद्द केल्याने, ‘इन्स्पेक्टर राज’ बळावण्याची भीती असल्याने या कायद्याचा शासनाने पुनर्विचार करावा.