तहसीलमधील महसूलचा कारभार वाऱ्यावर!
By admin | Published: May 20, 2017 01:40 AM2017-05-20T01:40:04+5:302017-05-20T01:40:04+5:30
नायब तहसीलदार रजेवर : कार्यरत इतर अधिकाऱ्यांवर प्रभार सोपविण्याची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : तहसील कार्यालयातील महसूल विभागाचे नायब तहसीलदार गेल्या आठ दिवसांपासून रजेवर असून, त्यांचा प्रभार अद्याप कुणाकडेही सोपविण्यात आलेला नाही. यामुळे कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांची चांगलीच गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेऊन कार्यरत नायब तहसीलदारांकडे अतिरिक्त प्रभार सोपवून कामे मार्गी लावावी, अशी मागणी मानवी हक्क सुरक्षा दल, या संघटनेने उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे १९ मे रोजी केली आहे.
या संदर्भातील निवेदनात नमूद करण्यात आले आहे, की तहसील कार्यालयातील महसूल अधिकारी हे महत्त्वाचे पद आहे. मात्र, वाशिमच्या तहसील कार्यालयात गेल्या आठ दिवसांपासून नायब तहसीलदार रजेवर गेले असून, ते कधी परततील, याची शाश्वती नाही. यामुळे जमीन तथा इतर विविध प्रकरणे प्रलंबित राहत आहेत. नायब तहसीलदारांच्या अनुपस्थितीमुळे तालुक्यातील नागरिकांना काम न होताच परत जावे लागत आहे.
उकळीपेन येथील सुमनबाई धवसे व शांताबाई भगत या ६० ते ६५ वयाच्या वृद्ध महिला गुरुवारी तलाठी अहवालासाठी पत्र मिळेल, या आशेने तहसील कार्यालयात दिवसभर थांबल्या होत्या. तहसील कार्यालयातील अधिकारी ढोके यांनी तहसीलदार अरखराव यांच्या आदेशानुसार पत्र तयार केले. मात्र, निवासी नायब तहसीलदार वानखडे व निवडणूक विभागाचे दंदी हे दोघेही हजर असताना व त्यांना स्वाक्षरी करण्याचा अधिकार असतानाही त्यांनी स्वाक्षरी केली नाही. त्यामुळे संबंधित वृद्ध महिलांसह जनुना-सोनवळ येथील जनार्धन लोखंडे व गोदमले यांच्यासह इतर महिला व नागरिकांना त्रास सहन करावा लागला. सायंकाळी त्यांना निराश होऊन परत जावे लागले. नायब तहसीलदारांच्या अनुपस्थितीचा फटका रोजमजुरी बुडवून कामासाठी येणाऱ्या नागरिकांनाही बसत असून, त्यांना होणारा हा त्रास रोखण्यासाठी सुटीवर गेलेल्या नायब तहसीलदाराचा प्रभार दुसऱ्या अधिकाऱ्यांना द्यावा, अशी मागणी करण्यात आली.
वाशिम तहसील कार्यालयातील महसूलचे नायब तहसीलदार यांनी आजारी रजा टाकली आहे. मात्र, तीन नायब तहसीलदार कार्यरत असून, त्यांच्यापैकी एकाकडे महसूलचा अतिरिक्त कारभार सोपविला जाईल. साधारणत: सोमवारपासून नागरिकांना जाणवणाऱ्या विविध अडचणी दूर करण्याचा तहसीलमार्फत सर्वंकष प्रयत्न केला जाणार आहे.
- बलवंत अरखराव, तहसीलदार, वाशिम