बांधांवर खते, बियाणे योजनेचा लाभ घ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:16+5:302021-05-11T04:43:16+5:30
मानोरा : खरीप हंगाम जवळ येत असून, गर्दीमुळे होणारा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांधांवर खते, बियाणे योजनेचा ...
मानोरा : खरीप हंगाम जवळ येत असून, गर्दीमुळे होणारा कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांनी बांधांवर खते, बियाणे योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तालुका कृषी अधिकारी के. डी. सोनटक्के यांनी केले आहे.
गतवर्षातील नैसर्गिक आपत्तीच्या संकटातून स्वत:ला सावरत यंदा शेतकरी हे खरीप हंगामासाठी नव्या जोमाने कामाला लागल्याचे दिसून येते. कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या संचारबंदीच्या काळात शेतकऱ्यांची गैरसोय होऊ नये तसेच कृषी सेवा केंद्रांमध्ये गर्दी होऊ म्हणून खते, बियाणे शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचून देण्याचा उपक्रम कृषी विभागाने हाती घेतला आहे. ऑनलाइन नोंदणी केल्यानंतर संबंधित बियाणे, खते, कीटकनाशके हे शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचविण्यात येणार आहेत. गतवर्षीदेखील हा उपक्रम कृषी विभागाने राबविला आहे. यंदाही खरीप हंगामावर कोरोनाचे सावट असून, बांधावर खते, बियाणे पुरविण्यात येणार आहेत. शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या पोर्टलवर आनलाइन नोंदणी करावी. त्यानुसार आवश्यक खते-बियाणे-कीडनाशके हे कृषी सेवा केंद्रामार्फत संबंधित शेतकऱ्यांच्या बांधांवर पोहोचविण्यात येणार आहे. लिंकद्वारे खते व बियाणांची मागणी कशी नोंदवावी यासाठी गावचे कृषी साहाय्यक, कृषिमित्र, प्रगतिशील शेतकरी यांची मदत घ्यावी, असे आवाहन सोनटक्के यांनी केले आहे.