जिल्हाधिकारी कार्यालयास कोरोनाचा विळखा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:43 AM2021-03-23T04:43:48+5:302021-03-23T04:43:48+5:30
वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग बाधित रुग्णांची संख्या १३ हजारांच्या घरात पोहोचली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात कोरोना विषाणू ...
वाशिम जिल्ह्यात कोरोना संसर्ग बाधित रुग्णांची संख्या १३ हजारांच्या घरात पोहोचली आहे. जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक गावात कोरोना विषाणू संसर्ग बाधित व्यक्ती आढळून येत आहेत. आता प्रशासकीय कार्यालयातही कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, तहसील कार्यालये, बांधकाम विभाग, वनविभाग, एसटी महामंडळ, सामाजिक वनीकरण विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग झालेला आहे. आता जिल्हाधिकारी कार्यालयातही कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत असून, या ठिकाणी सोमवार २२ मार्च रोजी सकाळपर्यंतच्या माहितीनुसार ११ अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग असल्याचे निदान झाले आहे. यातील बहुतेकांना गृह विलगीकरणात राहण्याचा सल्ला देण्यात आला असून, आरोग्य विभागाकडून त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष दिले जात आहे.
----------------
कामकाजावर परिणाम
विविध प्रशासकीय विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कोरोना संसर्ग होत असल्याने कार्यालयातील कर्मचाऱ्यांची संख्या घटत आहे. आधीच शासनाने ५० टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत कार्यालये सुरू ठेवण्याचे आदेश दिले असताना आता कोरोना संसर्ग वाढत असल्याने कामकाजावर परिणाम होत असल्याचे दिसत आहे.
----------
कोरोना चाचणीवर भर
प्रशासकीय कार्यालयात कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कार्यालयातील प्रत्येक अधिकारी, कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत. याची अंमलबजावणी युद्धपातळीवर केली जात आहे. त्यात कोरोना प्रतिबंधक लस न घेतलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी तातडीने लस घेण्याचे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.