योगाचे धडे गिरवा आणि निरोगी राहा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2021 04:26 AM2021-06-21T04:26:24+5:302021-06-21T04:26:24+5:30
वाशिम : पोषक आहाराबरोबरच योगाचे नियमित धडे गिरवा आणि निरोगी राहा, असा सल्ला योगतज्ज्ञांनी योग दिनाच्या पूर्वसंध्येला दिला आहे. ...
वाशिम : पोषक आहाराबरोबरच योगाचे नियमित धडे गिरवा आणि निरोगी राहा, असा सल्ला योगतज्ज्ञांनी योग दिनाच्या पूर्वसंध्येला दिला आहे.
दरवर्षीप्रमाणे यावर्षीही २१ जून हा आंतरराष्ट्रीय योगा दिन कोरोनाकाळात काही पथ्ये पाळून साजरा केला जाणार आहे. गत दीड वर्षापासून संपूर्ण जग हे कोरोनाशी लढा देत आहे. रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी प्रथिनेयुक्त आहार, व्यायामावर भर दिला जात आहे. याप्रमाणेच विविध प्रकारच्या योगाद्वारेदेखील निरोगी राहण्याचा सल्ला योग तज्ज्ञांनी दिला. योगाशास्त्रामध्ये यमनियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, बंध, मुद्रा, शुद्धिक्रिया इत्यादींचा समावेश होतो. कोणत्याही किंवा मोठ्या आजाराची सुरुवात ही मानसिक आजारानेच होत असते. यमनियमाचे पालन केल्याने मन प्रसन्न, आनंदी सकारात्मक राहते. अप्रत्यक्षरीत्या मनाची शुद्धी यमनियमाद्वारे होते व मानसिक आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते, असा दावा योग तज्ज्ञांनी केला. ‘आसन’ या पद्धतीद्वारे फुप्फुसांची, तसेच पचनेंद्रियांची कार्यक्षमता वाढते. प्राणायामद्वारे प्राणवायू भरपूर प्रमाणात मिळतो, याशिवाय पूरक ऐच्छिकतेने दीर्घ श्वास घेणे, कुंभक श्वास रोखणे, रेचक ऐच्छिकतेने श्वास सोडणे यामुळे फुप्फुसांची कार्यक्षमतादेखील वाढते. ध्यान ही एक मानसिक प्रक्रिया आहे. मानसिक आरोग्य राखण्यासाठी ध्यान सर्वोत्तम अभ्यास आहे. शुद्धिक्रियेमध्ये शरीराची अंतर्गत शुद्धी केली जाते. शरीर निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येकाने योगाचे नियमित धडे गिरवावेत, असा सल्ला योगतज्ज्ञांनी दिला.
......
.....
कोट बॉक्स
कोरोनाच्या संकटकाळात आरोग्य राखणे, टिकवून ठेवणे, रोगप्रतिकारशक्ती वाढविणे आवश्यक बनले आहे. पौष्टिक व प्रथिनेयुक्त आहाराबरोबरच योगशास्त्रामध्ये योगालाही महत्त्व आहे. निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने योगाकडे वळणे आवश्यक ठरत आहे.
- पूजा मधुकर राऊत
योगतज्ज्ञ, वाशिम
---------------------------बॉक्स
ऑनलाइन पद्धतीने योग दिनाचे आयोजन
क्रीडा व युवक सेवा संचालनालय आणि वाशिम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, तसेच शिक्षण विभाग व आयुष विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे औचित्य साधून विविध कार्यक्रमांचे ऑनलाइन आयोजन सकाळी ७ वाजेदरम्यान करण्यात येणार आहे. मोठ्या प्रमाणात या कार्यक्रमात सहभाग नोंदवावा, असे आवाहन प्रभारी जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.