"आॅनलाईन"च्या युगात तलाठी अप्रशिक्षित!
By Admin | Published: June 14, 2017 08:07 PM2017-06-14T20:07:14+5:302017-06-14T20:07:14+5:30
महसूल विभागातील महत्वपूर्ण घटक असलेल्या तलाठ्यांना देखील प्रशिक्षण मिळणे दुरापास्त झाल्याने त्याचा थेट दैनंदिन कामांवर परिणाम जाणवत आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, आॅनलाईन प्रणालीच्या युगात प्रशासकीय यंत्रणेतील प्रत्येक घटक तांत्रिकदृष्ट्या प्रगल्भ असणे गरजेचे आहे. मात्र, अद्ययावत प्रशिक्षणाअभावी अनेक कर्मचारी अद्याप संगणक ज्ञानापासूनही दुरच आहेत. महसूल विभागातील महत्वपूर्ण घटक असलेल्या तलाठ्यांना देखील प्रशिक्षण मिळणे दुरापास्त झाल्याने त्याचा थेट दैनंदिन कामांवर परिणाम जाणवत आहे.
जिल्ह्यातील बहुतांश तलाठ्यांना गावपातळीवर अद्यापपर्यंत स्वतंत्र कार्यालय मिळालेले नाही. निवासस्थानांची सुविधा उपलब्ध नाही. अवैध रेती वाहतूकप्रकरणी कारवाई करताना संरक्षण नाही, नियमित वेतन मिळत नाही, रिक्त पदांचा अतिरिक्त ताण सोसावा लागत असल्याचे तलाठ्यांचे म्हणणे आहे. या समस्यांवर प्रभावी तोडगा काढून संगणक प्रणालीचे अद्ययावत प्रशिक्षण नियमित मिळावे, अशी मागणी तलाठी वर्गातून होत आहे.