तलाठ्यांना लॅपटॉप मिळाले; प्रिंटरची प्रतीक्षा कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 03:19 PM2020-02-05T15:19:14+5:302020-02-05T15:19:24+5:30
गतवर्षी ८० लाखांची तरतूद करून जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : विविध स्वरूपातील आॅनलाईन कामे वेळेत पूर्ण व्हावी, यासाठी जिल्हा प्रशासनाने तलाठ्यांना ‘लॅपटॉप’ दिले; मात्र काही तलाठ्यांना ते मिळालेले नाहीत. प्रिंटर मिळण्याची प्रतीक्षाही कायम असल्याने कामात व्यत्यय निर्माण होत आहे.
गत काही महिन्यांपासून प्रशासकीय कामकाज बहुतांशी आॅनलाईन झाले आहे. आपत्कालिन स्थितीदरम्यान नुकसानाचे सर्वेक्षण, पंचनामा करणे यासह शेतीसंदर्भातील इतर कामे, महसूलविषयक विविध कामांची जबाबदारी प्रामुख्याने तलाठ्यांना पार पाडावी लागते. ही कामे करताना अडचण जाऊ नये, कामकाज वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी तलाठ्यांना लॅपटॉप आणि प्रिंटर देण्यास शासनाने मंजूरी दिली होती. त्यानुसार, ‘डीपीडीसी’तून गतवर्षी ८० लाखांची तरतूद करून जिल्ह्यातील तलाठ्यांना लॅपटॉप देण्यात आले; परंतु बहुतांश तलाठ्यांना प्रिंटर मिळालेले नाही. यामुळे तलाठ्यांना कामकाज करताना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. दरम्यान, हा प्रश्न लवकरच निकाली निघेल, अशी ग्वाही निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे यांनी दिली.