जलसंधारणाच्या कामासंदर्भात १९ सप्टेंबरपासून तालुकास्तरीय कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2018 04:33 PM2018-09-18T16:33:38+5:302018-09-18T16:33:45+5:30
अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे केली जाणार असून, सर्वांना इत्यंभूत माहिती देण्यासाठी १९ सप्टेंबरपासून तालुकास्तरीय कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : मृद व जलसंधारण विभाग आणि भारतीय जैन संघटना यांच्यात झालेल्या सामंजस्य करारानुसार वाशिम जिल्हा दुष्काळमुक्त करण्यासाठी ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत जलसंधारणाची कामे केली जाणार असून, सर्वांना इत्यंभूत माहिती देण्यासाठी १९ सप्टेंबरपासून तालुकास्तरीय कार्यशाळेला प्रारंभ होणार आहे.
टंचाईवर मात करण्यासाठी जिल्ह्यात जास्तीत जास्त जलसंधारणाची कामे होण्यासाठी शासन, प्रशासन व भारतीय जैन संघटना यांच्यावतीने ‘सुजलाम, सुफलाम वाशिम अभियान’ हाती घेण्यात आले आहे. या अभियानाच्या माध्यमातून जिल्ह्यात जलसंधारणाची अधिकाधिक कामे पूर्ण करून जिल्हा दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प करण्यात आलेला आहे. भारतीय जैन संघटना जलसंधारणाच्या कामासाठी मोफत जेसीबी व पोकलेन मशीन उपलब्ध करून देणार आहे तर यासाठी लागणारे डीझेल शासनामार्फत पुरविले जाणार आहे. या अभियानासंदर्भात गावपातळीवरील घटकांना माहिती देण्यासाठी तालुकास्तरीय कार्यशाळांचे आयोजन केले असून, १९ सप्टेंबर रोजी वाशिम व मालेगाव तालुक्यासाठी वाशिम येथे कार्यशाळा होणार आहे. मंगरूळपीर येथेदेखील १९ सप्टेंबरलाच कार्यशाळा होणार आहे. २१ सप्टेंबर रोजी कारंजा व मानोरा येथे कार्यशाळा होणार असून, २४ सप्टेंबर रोजी रिसोड येथे कार्यशाळा होणार आहे. या कार्यशाळेच्या माध्यमातून प्रशिक्षण दिले जाणार आहे. तहसिलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी यांच्यासह जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहायक, तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष, कंत्राटी तांत्रिक अधिकाºयांची उपस्थिती लाभणार आहे.