अतिटंचाईग्रस्त खेर्डी गावात टँकर अद्याप पोहचलेच नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2019 03:23 PM2019-05-22T15:23:35+5:302019-05-22T15:23:43+5:30
खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले.
मालेगाव : तालुक्यातील खेर्डी या गावातील सर्वच जलस्त्रोत एप्रिल महिन्याच्या सुरुवातीपासून कोरडे पडले. त्यामुळे प्रशासनाने गावाला टँकरने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होत असताना प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने टँकर अद्यापही गावात पोहोचले नाही. यामुळे पाण्यावाचून ग्रामस्थांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत. नागपूर-औरंगाबाद महामार्गावरील पांगरीकुटे या गावापासून जवळच खेडी नावाचे गाव वसलेले आहे. गावात पाणीपुरवठ्याचा कुठलाही प्रभावी स्त्रोत उपलब्ध नाही. त्यामुळे दरवर्षी मार्च, एप्रिल महिन्यातच गावक-यांना तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागते. तशीच गंभीर परिस्थिती यंदाही उद्भवली आहे. त्यामुळे प्रशासनाने टँकरव्दारे गावाला पाणीपुरवठा करावा, अशी मागणी गावक-यांमधून होत आहे; परंतु टँकर अद्याप सुरू झालेले नाही.
-----------------
ऋषी महाराज संस्थानवरील भोजनावळींवरही परिणाम
खेर्डी येथे ऋषी महाराजांचे प्रसिद्ध देवस्थान आहे. या ठिकाणी मालेगाव तालुकाच नव्हे; तर नजिकच्या बुलडाणा व अकोला जिल्ह्यातून भाविक दर्शनासाठी येतात. यानिमित्त सोमवारी, गुरुवारी प्रसाद म्हणून भोजन दिले जाते. यंदा मात्र भीषण पाणीटंर्चामुळे या धार्मिक कार्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.
................
ग्रामपंचायतीचे प्रयत्न ठरले निष्फळ
रेगाव-खेर्डी गट ग्रामपंचायतचे ग्रामसेवक विलास नवघरे, सरपंच वेणूबाई रमेश खंडारे, उपसरपंच ज्ञानेश्वर बापूराव आंधळे यांच्यासह अन्य ग्रामपंचायत सदस्यांनी खेर्डी गावाला तत्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा ठराव घेवून तो मालेगाव पंचायत समितीला सादर केला; मात्र ग्रामपंचायतीचे हे प्रयत्न निष्फळ ठरले असून टँकर अद्याप सुरू झालेले नाही.
....................
गावकरी आंदोलनाच्या पवित्र्यात
खेर्डी गावाला विनाविलंब टँकरने पाणीपुरवठा सुरू करा; अन्यथा मालेगाव पंचायत समिती व तहसील कार्यालयावर घागर मोर्चा काढू, असा इशारा सरपंच वेणूबाई खंडारे, उपसरपंच आंधळे, कल्पना गायकवाड, सत्यभामा काळे, सिंधू सातपुते, रेखा घुगे, कान्होपात्रा आंधळे, सुनिता शेंडगे, कल्पना शेंडगे, काळुबाई कालापाड, लक्ष्मीबाई इंगोले, प्रतिभा गायकवाड, नेहा आंधळे, अरूणा थिटे, लक्ष्मी काळे, सुभद्रा आंधळे, कौशल्या भेंडेकर आदिंनी दिला आहे.