तलाठ्यांचा कारभार चालतोय भाड्याच्या खोलीतून !
By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2017 06:05 PM2017-12-12T18:05:33+5:302017-12-12T18:05:47+5:30
मालेगाव (वाशिम): महसूल विभागाचा कणा म्हणून परिचित असलेल्या बहुतांश तलाठ्यांना स्वतंत्र जागा व इमारत नसल्याने भाड्याच्या खोलीतून कारभार हाकण्याची वेळ आली आहे.
मालेगाव (वाशिम): महसूल विभागाचा कणा म्हणून परिचित असलेल्या बहुतांश तलाठ्यांना स्वतंत्र जागा व इमारत नसल्याने भाड्याच्या खोलीतून कारभार हाकण्याची वेळ आली आहे. मालेगाव तालुक्यातील तलाठ्यांना गत पाच वर्षांपासून खोलीच्या भाड्यापोटी रक्कमही मिळाली नाही. संपूर्ण जिल्ह्यात तलाठी कार्यालयासाठी केवळ ९ शासकीय इमारती असून, त्याचीही दुरुस्ती रखडली असल्याचे विश्वसनीय सूत्र आहे.
शासनाचा १४ फेब्रुवारी १९९२च्या शासन निर्णयाने तलाठ्यांना कार्यालय नसल्यास, खासगी जागा कार्यालयासाठी घेता येते. यासाठी १२५ रुपये भाड्यापोटी मिळत होते. बदलत्या काळानुसार, भाड्याच्या रकमेत वाढ करण्यात आली. ५ जून २०१३ च्या शासन निर्णयानुसार शासनाने ग्रामीण भागाकरिता एक हजार रुपये आणि शहरी भागाकरिता दोन हजार रुपये मंजूर केलेले आहेत. गत पाच वर्षांपासून तलाठ्यांना भाड्यापोटी एक रुपयादेखील मिळाला नाही. तलाठी हा ग्रामीण भागातील महसूलचा महत्त्वाचा दुवा आहे. जमीन महसूल वसूल करणे, अकृषक कर वसूल करणे, अवैध गौण खनिज वाहतूकप्रकरणी दंड वसूल करणे यासह अन्य महत्त्वाची कामे तलाठ्यांवर सोपविण्यात आली आहेत. मात्र, काही ठिकाणचा अपवाद वगळता बहुतांश तलाठ्यांना स्वतंत्र जागा व कार्यालय नसल्याने कामकाज करताना तलाठ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
मालेगाव तालुक्यात एकूण ९ मंडळ अधिकारी असून त्यापैकी एक पद रिक्त आहे. १२२ गावे मिळून ४८ तलाठी असून ४९ साजे आहेत. मालेगाव मंडळात एकूण १४ गावे आहेत तर शिरपूरमध्ये ९, किन्हिराजामध्ये १४, मेडशीमध्ये १६, मुंगळा १५, जऊळका रेल्वे १६, करंजी २४ आणि चांडस मंडळात एकूण १२ गावे येतात. एकही स्वतंत्र मंडळ कार्यालय नाही. सध्या ४७ इमारती भाडेतत्त्वावर आवश्यक आहेत. शासनाने तलाठ्यांसाठी स्वतंत्र जागा व इमारत उपलब्ध करून द्यावी किंवा भाड्याची इमारत व भाड्याच्या रकमेची व्यवस्था करावी, अशी मागणी तलाठी, मंडळ अधिका-यांमधून होत आहे.