तऱ्हाळा आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2021 04:42 AM2021-03-27T04:42:56+5:302021-03-27T04:42:56+5:30
वाशिम : जिल्ह्यात आजपासून काही आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा उपकेंद्रावर आज, ...
वाशिम : जिल्ह्यात आजपासून काही आरोग्यवर्धिनी उपकेंद्रांवर कोरोना लसीकरण मोहीम सुरु करण्यात आली आहे. मंगरूळपीर तालुक्यातील तऱ्हाळा उपकेंद्रावर आज, २६ मार्च रोजी पहिल्याच दिवशी दुपारी ४.३० वाजेपर्यंत ११७ व्यक्तींनी कोरोना प्रतिबंधक लस टोचून घेतली.
जिल्ह्यात सध्या ४५ ते ५९ वर्षे वयोगटातील दीर्घ आजार असलेल्या व्यक्ती व ६० वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस दिली जात आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालये, कारंजा उपजिल्हा रुग्णालय व जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये शासकीय लसीकरण केंद्र सुरु असून असून याठिकाणी कोरोना प्रतिबंधक लस मोफत देण्यात येत आहे. तसेच आजपासून जिल्ह्यात काही आरोग्य उपकेंद्रांवर सुद्धा लसीकरण सुरु करण्यात आले आहे. वनोजा प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत तऱ्हाळा उपकेंद्रावर आजपासून लसीकरण मोहीम सुरु झाली असून आज पहिल्याच दिवशी गावातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून आला. पहिल्याच दिवशी दुपारी ४.३० वाजेपर्यंत गावातील ११७ व्यक्तींनी कोरोनाची लस टोचून घेतली.
ग्रामस्तरावर आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षक व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून गावामध्ये लसीकरणाविषयी माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे लसीकरण सुरु झाल्यापासूनच नागरिक स्वयंस्फूर्तीने लसीकरण केंद्रावर येत होते. आरोग्य विभागामार्फत याठिकाणी सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून लस घेतल्यानंतर प्रत्येक व्यक्तीला ३० मिनिटे निगराणीत घेवण्यात आले, यादरम्यान कोणालाही त्रास झाला नाही. त्यामुळे त्यांना घरी पाठविण्यात आले.