वाशिम जिल्ह्यातील टीबी आणि एचआयव्ही रूग्णांचीही हाेणार कोरोनाची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 03:52 PM2020-11-24T15:52:48+5:302020-11-24T15:53:07+5:30
Washim News जिल्ह्यात क्षयरुग्ण व एडस् रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता १ डिसेंबरपासून क्षयरोग (टीबी) व एचआयव्ही पाॅझिटिव्ह (एडस) रुग्णांची कोरोना चाचणी केली जाणार आहे. त्या दृृष्टीकोनातून जिल्ह्यात आरोग्य विभागातर्फे पूर्वतयारी करण्यात येत आहे.
नोव्हेंबर महिन्यात कोरोनाचा आलेख खाली आल्याने जिल्हावासियांना दिलासा मिळत आहे. परंतू, डिसेंबर महिन्यात कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. ही शक्यता लक्षात घेता जिल्ह्यात क्षयरुग्ण व एडस् रुग्णांचे घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाने चमू नेमल्या असून, कोणत्या तालुक्यात कोणती चमू जाणार, सर्वेक्षण व तपासणी याचे नियोजन करण्यात येत आहे. क्षयरुग्ण तसेच एडस रुग्णांना कोरोनाचा संसर्ग झाला का, या गटातील रुग्ण जोखीम गटात आहे का या अनुषंगाने हे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. या सर्वेक्षणादरम्यान संदिग्ध दिसून येणाऱ्या रुग्णांची कोरोना चाचणी करण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने आरोग्य विभागाची तयारी सुरू आहे.
जोखीम व अतिजोखीम गटातील नागरिकांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका असतो. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जोखीम व अतिजोखीम गटातील रुग्णांचे सर्वेक्षण केले जाणार आहे. क्षयरुग्ण व एचआयव्ही पाॅझिटिव्ह रुग्णांचेदेखील सर्वेक्षण केले जाणार आहे.
- डाॅ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी वाशिम