शिक्षक बदली प्रकरण गाजले!

By admin | Published: May 23, 2017 01:33 AM2017-05-23T01:33:09+5:302017-05-23T01:33:09+5:30

जिल्हा परिषद स्थायी समितीची सभा : सखोल चौकशीचा आदेश

Teacher changed case! | शिक्षक बदली प्रकरण गाजले!

शिक्षक बदली प्रकरण गाजले!

Next



लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी कारंजा तालुक्यात केलेल्या शिक्षक बदली प्रकरणावर स्थायी समितीच्या सभेत वादळी चर्चा झाल्यानंतर, जिल्हा परिषद अध्यक्षांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.
जिल्हा परिषदेच्या स्व. वसंतराव नाईक सभागृहात जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेला सोमवारी दुपारी २ वाजता सुरुवात झाली. सभेच्या अध्यक्षस्थानी पीठासीन अधिकारी तथा जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख होत्या. यावेळी मंचावर मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी के.एम. अहमद, कृषी व पशुसंवर्धन सभापती विश्वनाथ सानप, शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर पाटील गोळे, समाजकल्याण सभापती पानुताई जाधव आदींची उपस्थिती होती. सुरुवातीलाच जिल्हा परिषद सदस्य उस्मान गारवे यांनी कारंजा तालुक्यातील जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदली प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता काही शिक्षकांच्या बदल्या केल्याचा आरोप केला. वरिष्ठांची पूर्वपरवानगी न घेता शिक्षकांची बदली करणे, हा गंभीर प्रकार असल्याचे जिल्हा परिषद सदस्यांनी सभागृहात सांगितले. यापूर्वीही हा मुद्दा सभागृहात उपस्थित करण्यात आला होता. मात्र, यावर अद्यापही ठोस कार्यवाही नसल्याने सभागृहातील ठरावांची अंमलबजावणी होत नसल्याबद्दल गारवे यांनी खंत व्यक्त केली. यावर या प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्याचे निर्देश जिल्हा परिषद अध्यक्ष देशमुख यांनी दिले. प्रभारी गटशिक्षणाधिकारी शिक्षकांची नियमबाह्य बदली करीत असेल, तर ही बाब गंभीर असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देशमुख यांनी केल्या. जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी यांनी समाजकल्याण विभागाने केलेल्या साहित्य खरेदीचा मुद्दा उपस्थित केला. समाजकल्याण विभागाने २० टक्के जि.प. सेस अंतर्गत व शेतात एचडीपी पाइप पुरविणे या शीर्षा अंतर्गत सन २०१४-१५ या सत्रातील स्प्रिंकलर पाइप खरेदीचे कार्यारंभ आदेश दिलेले असताना, संबंधित कंत्राटदाराने ९० एमएम ऐवजी ७० एमएमच्या पाइपचा पुरवठा कसा काय केला, असा सवाल गवळी यांनी उपस्थित केला. ७५ एमएम आणि ९० एमएम आकाराचे पाइप खरेदी करण्याचा आदेश दिला होता. मात्र, संबंधित कंत्राटदाराने दोन्ही प्रकारातील पाइप ७५ एमएम आकाराचे पुरविल्याचे गवळी यांनी सभागृहात सांगितले. यामध्ये अनियमितता झाल्याचा मुद्दा उपस्थित केल्याने अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अहमद यांनी या प्रकाराची संपूर्ण चौकशी करण्याच्या सूचना केल्या. पाणीटंचाई, वॉटर न्यूट्रल, घरकुल अनुदान यासह अन्य विषयांवर चर्चा झाली. सभेला जिल्हा परिषद सदस्य विकास गवळी, सचिन रोकडे, उस्मान गारवे, शंकर बोरकर यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य, विभागप्रमुखांची उपस्थिती होती. सभेचे प्रशासकीय कामकाज पंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद कापडे यांनी पाहिले.

अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबाबत चिंता
जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत अनेक विभागप्रमुख, विभागप्रमुखांचे प्रतिनिधी अनुपस्थित राहत असल्याबद्दल पीठासीन अधिकारी हर्षदा देशमुख यांनी चिंता व्यक्त केली. स्थायी समितीच्या तीन सभेला उपस्थित न राहिल्यास जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह सदस्याला पद गमवावे लागते. मग तीन सभेला उपस्थित न राहणाऱ्या विभागप्रमुखांविरूद्ध किंवा संबंधित अधिकाऱ्यांविरूद्ध कोणती कारवाई करता येते, असा मुद्दाही देशमुख यांनी उपस्थित केला.

Web Title: Teacher changed case!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.