शिक्षकाने घेतला महामार्गावरील खड्डे बुजविण्याचा ध्यास!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2020 02:24 PM2020-01-13T14:24:39+5:302020-01-13T14:24:44+5:30
शिक्षकाने मेडशी ते मालेगाव यादरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा पक्का निर्धार करून ते यासाठी दैनंदिन श्रमदान करताना दिसून येत आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : काही दिवसांपूर्वी सायंकाळच्या सुमारास पत्नी आणि मुलीला सोबत घेऊन ते अकोला येथून मालेगावकडे येत असताना खड्डयातून वाहन उसळले. दैव बलवत्तर म्हणून तीघेही वाचले; पण यामुळे अस्वस्थ झालेल्या त्याच शिक्षकाने मेडशी ते मालेगाव यादरम्यानच्या रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा पक्का निर्धार करून ते यासाठी दैनंदिन श्रमदान करताना दिसून येत आहेत.
अकोला ते वाशिम या महामार्गावर अनेक ठिकाणी खड्डे पडले असून ते बुजविण्याकामी प्रशासनाने उदासिनतेचे धोरण अवलंबिले आहे. खड्डयांमुळे दुचाकी घसरून अपघात होण्याच्या घटना दैनंदिन घडत आहेत. दरम्यान, काही दिवसांपूर्वी शिक्षक अनिल गायकवाड हे त्यांची पत्नी व मुलीला सोबत घेऊन दुचाकी वाहनाने अकोला येथून मालेगाकडे येत असताना रिधोरा फाट्यानजिकच्या वळण रस्त्यावरील खड्डयातून दुचाकी वाहन उसळले. यामुळे पत्नी आणि मुलगी जमिनीवर पडून त्यांना दुखापत झाली. दैव बलवत्तर म्हणून तिघांचेही प्राण वाचले.
या घटनेनंतर मात्र शिक्षक अनिल गायकवाड यांना कमालीचे अस्वस्थ केले. खड्डयांमुळे होणाऱ्या अपघातांमध्ये इतर कुणाला दुखापत होऊ नये किंवा कुणाचा जीव जावू नये, यासाठी त्यांनी आता स्वत:च पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, दररोज सकाळच्या सुमारास ते आपल्या दुचाकी वाहनास टोपले, फावले आणि टिकास बांधून घरून निघतात व मालेगाव ते मेडशी मार्गावरील खड्डे बुजविण्याचे काम सुरू करतात. त्यांनी हाती घेतलेल्या या उपक्रमाचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे. तथापि, प्रशासनानेही शिक्षक गायकवाड यांच्या पुढाकाराची दखल घेऊन खड्डयांच्या डागडूजीचे काम हाती घ्यावे, अशी अपेक्षा सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
अंधश्रद्धा नव्हे; तर परिश्रमाला दिले प्राधान्य
शिक्षक अनिल गायकवाड यांच्या दुचाकी वाहनास अपघात झाल्याचे वृत्त आप्तेष्टांना कळले, तेव्हा घटनास्थळी दही, भात, लिंबू उतरवून टाकण्याचा सल्ला देण्यात आला; परंतु कोणत्याही अंधश्रद्धेवर विश्वास न ठेवता शिक्षक गायकवाड यांनी हातात फावडे, टोपले व टिकास घेऊन स्वत:च खड्डे बुजविण्याचा संकल्प केला. प्रशासन रस्त्यांची डागडूजी करेल तेव्हा करेल; पण खड्डयांमुळे कुणाचा जीव जाऊ नये, हा उद्देश समोर ठेऊन तथा प्रशासनाला दोष न देता गायकवाड हे गत काही दिवसांपासून रस्त्यांवरील खड्डयांमध्ये माती व दगड टाकून ते बुजवत असल्याचे दिसून येत आहे. त्यांचा हा उपक्रम कौतुकास्पद, तेवढाच प्रेरणादायी देखील ठरत आहे.