अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या शिक्षकांच्या हालचाली !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2017 08:39 PM2017-09-27T20:39:11+5:302017-09-27T20:39:50+5:30
मालेगांव : - शिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे तसेच अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले असून, अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली शिक्षक संघटनांमधून सुरू झाल्याचे दिसून येते.
लोकमत न्यूज नेटवर्क
मालेगांव : - शिक्षण विभागाच्या आॅनलाइन धोरणामुळे तसेच अशैक्षणिक कामांमुळे मुख्याध्यापक व शिक्षक वैतागले असून, अशैक्षणिक कामांवर बहिष्कार टाकण्याच्या हालचाली शिक्षक संघटनांमधून सुरू झाल्याचे दिसून येते.
शालेय पोषण आहार, हजेरी टपा नोंद, उपस्थिती भत्ता, विविध शिष्यवृत्ती अर्ज, शालार्थ, नवोदय परीक्षा, गणवेश, संच मान्यता, सरल, शाळा सोडण्याचा दाखला यासह एकूण २५ प्रकारची कामे आता शिक्षक वर्गावर आली आहेत. त्यामुळे एकूण अध्यापनावर त्याचा थेट परिणाम होत असल्याचा दावा मुख्याध्यापक व शिक्षक संघटनांनी केला. अनेक वेळा आर्थिक भुर्दंडसुद्धा सहन करावा लागतो. वेळेचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होतो. आॅनलाईन प्रक्रिया किंवा अन्य अशैक्षणिक कामे पूर्ण करण्याची कोणतीही सुविधा शाळास्तरावर शासनाने उपलब्ध करून दिली नाही. त्यासाठी नेहमी तालुका ठिकाणी जावे लागते. यामध्ये वेळेचा व पैशाचा अपव्यय होत आहे. एका दिवसात काम झाले नाही तर दुसºया दिवशी पुन्हा तालुका ठिकाणी जावे लागते. मग विद्यार्थ्यांना शिकवावे कधी? असा प्रश्न शिक्षकांनी उपस्थित केला आहे.
बरेच वेळा अनेक निरोप ‘व्हाट्स अप’च्या माध्यमातून मिळतात. या निरोपानुसार, एखादी माहिती तातडीने त्या-त्या कार्यालयात जमा करा, अशा सूचना मिळतात. एखाद्यावेळी अध्यापन सुरू असताना ‘व्हाट्स अप’चा संदेश बघण्यात आला नाही तर वरिष्ठांकडून तंबीही दिली जाते. यामुळे सध्या मानसिक तणावाखाली असल्याचा दावा शिक्षक व मुख्याध्यापक संघटनांनी केला.
यासाठी शिक्षक संघटना मिळून सर्वांनी एकत्र येऊन लढ़ा देण्याच्या हालचाली सुरू झाल्याची माहिती आहे. अशैक्षणिक कामे काढून घ्यावी, आॅनलाईन किंवा संगणकीय कामासाठी तालुकास्तरावर जाण्याकरिता एका विशिष्ट कर्मचाºयाची नियुक्ती करावी, पत्र व्यवहारसाठी ‘व्हाट्स अप’ची सक्ती करू नये आदी मागण्या शिक्षक संघटनांनी शिक्षण विभागाकडे केल्या आहेत.
सध्या शिक्षक आणि मुख्याध्यापकांवर अशैक्षणिक तसेच आॅनलाईन कामाचा प्रचंड ताण निर्माण झाला आहे. त्यामुळे आमचे शिक्षक बांधव चिंतेच्या सावटाखाली राहतात. शासनाने आॅनलाइनची कामे त्रयस्त व्यक्तींकडून करुन घ्यावी. यासाठी सर्व शिक्षक संघटनांनी एकत्र येण्याची गरज आहे.
- मंचकराव तायडे, राज्य उपाध्यक्ष, महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना