पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती अखेर सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2021 11:49 AM2021-05-15T11:49:18+5:302021-05-15T11:49:30+5:30
Teacher recruitment News : विविध कारणांनी रखडलेली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती अखेर सुरू झाली आहे़.
- संदीप वानखडे
बुलडाणा : गत काही महिन्यांपासून विविध कारणांनी रखडलेली पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती अखेर सुरू झाली आहे़. १४ मे राेजी पवित्र पाेर्टलवर मुलाखतीशिवाय रिक्त राहिलेल्या १९६ जागांसाठी यादी जाहीर करण्यात आली आहे़. कागदपत्रे पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले, कागदपत्रे पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले, नियुक्ती आदेश देऊनही विहित मुदतीत रुजू न झालेले उमेदवारांमुळे या जागा रिक्त राहिल्या हाेत्या़.
पारदर्शक शिक्षक भरती करण्यासाठी युती शासनाच्या काळात पवित्र पाेर्टल तयार करण्यात आले हाेते़ .या पाेर्टलच्या माध्यमातूनच शिक्षक भरती करण्याचा निर्णय सरकारने घेतला हाेता़ ७ फेब्रुवारी २०२० राेजी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली हाेती़ या यादीवर काही उमेदवारांनी आक्षेप घेत उच्च न्यायालयात धाव घेतली हाेती़. या याचिकांवर उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून १४ मे राेजी विशेष फेरी घेण्यात आली़.
पवित्र पोर्टलमार्फत मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या संस्थांतील इयत्ता ९ वी ते इयत्ता १२ वी या गटातील नियुक्तीसाठी शिफारस पात्र उमेदवारांची दिनांक ७ फेब्रुवारी २०२० रोजी यादी प्रसिद्ध करण्यात आली होती. या यादीतील उमेदवारांच्या नियुक्तीसाठी संबंधित नियुक्ती प्राधिकारी यांनी उमेदवारांची पात्रता पडताळणी करून पात्र असणाऱ्या उमेदवारांना नियुक्ती आदेश दिलेले आहेत. विहित मुदतीनंतर कागदपत्र पडताळणीमध्ये अपात्र ठरलेले, कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर राहिलेले, नियुक्ती आदेश देऊनही विहित मुदतीत रुजू न झालेले उमेदवार अशा एकूण १९६ रिक्त जागांवर पवित्र पोर्टलमधील यादीतील गुणवत्तेनुसार उर्वरित पात्र उमेदवार संबंधित व्यवस्थापनाच्या मागणीनुसार उपलब्ध करून देण्यासाठी ही फेरी घेण्यात आली आहे़ १४ मे राेजी निवड यादी जाहीर करण्यात आली असून उमेदवारांना नियुक्ती मिळालेल्या संस्थेमध्ये रुजू व्हावे लागणार आहे़.
मुलाखतीसह पदभरती लवकरच
गेल्या वर्षभरापासून पवित्र पाेर्टलवरील शिक्षक भरती रखडली हाेती़ मुलाखतीशिवाय पर्याय निवडलेल्या खासगी संस्था आणि जिल्हा परिषद, नगर पालिकांच्या शाळांमध्ये निवड झालेल्या उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यात आली हाेती़ मुलाखतीसह पदभरतीची उमेदवारांना प्रतीक्षा हाेती़ रिक्त जागासाठी निवड यादी जाहीर झाल्याने मुलाखतीसह पदभरती लवकरच हाेणार असल्याचे संकेत आहेत़
मुलाखतीसह पदभरतीबाबतच्या सूचना स्वतंत्रपणे देण्यात येतील.