Teacher's Day Special : शिक्षकांमुळेच माणुसकी, नैतिकतेचे धडे मिळाले...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2020 12:45 PM2020-09-05T12:45:29+5:302020-09-05T12:45:37+5:30
‘आयएमए’चे वाशिम जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.
- संतोष वानखडे
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पुस्तकी ज्ञान देण्याबरोबरच जीवन कसे जगावे, नैतिकता, माणूस म्हणून जगण्याचे धडे शिक्षकांकडूनच मिळाले, अशा शब्दात वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी तथा ‘आयएमए’चे वाशिम जिल्हाध्यक्ष डॉ. अनिल कावरखे यांनी शिक्षकांप्रती आदर व्यक्त केला.
शिक्षकांच्या शिकवणीमुळेच कोरोना वार्डात सेवा देतोय..
जीवनात माणुसकीला महत्व दे, प्रत्येकाकडे एक माणूस म्हणून बघ, शक्य असेल तेव्हा त्यांची नि:स्वार्थ भावनेतून सेवा कर अशी शिकवण गुरूजनांकडून मिळाली. या शिकवणीमुळेच आज जिल्हा रुग्णालयात कोरोना वार्डमध्ये न घाबरता रुग्ण सेवा देऊ शकत आहे. आयुष्यात शेवटच्या श्वासापर्यंत रूग्णसेवा करीतच राहणार.
नाईक सर म्हणायचे नितिमत्ता सोडू नको...
गोरेगाव (जि. हिंगोली) येथील जिल्हा परिषद शाळेत माध्यमिक शिक्षण घेत असताना जे. एस.नाईक सरांनी नितिमत्तेने जगायचे कसे हे शिकविले. ते नेहमी सांगायचे की, ज्या दिवशी मला कळेल की, तु तुझी नितिमत्ता सोडली, तो दिवस माझ्या आयुष्यातील अत्यंत दु:खी असेल व तुला शिकविण्यामध्ये मी कमी पडलो, असे मानेल.
त्यांचे हे शब्द माझ्या थेट काळजात भिडले. त्यांच्या अपघाती निधनानंतर अंत्यसंस्काराच्या वेळी त्यांच्या मृतदेहासमोर वचन दिले की, मी जिवनात असे कधीही वागणार नाही, नितिमत्ता सोडणार नाही.
डॉ. गंगा सरांनी बारकावे शिकविले
नांदेड येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसचे शिक्षण घेत असताना अॅनाटॉमीचे डॉ. गंगा सरांनी वैद्यकीय शिक्षणातील बारकावे शिकविले.मुलाप्रमाणे सांभाळले. त्यांची शिकवण कदापिही विसरू शकणार नाही.
आज जिवनात जेवढा यशस्वी आहे ते या सर्व गुरुजनांमुळेच.....
गुरूजनांमुळेच मी घडलो...
जि.प. प्राथमिक शाळा गोरेगाव येथे भास्करराव आहेर सरांनी प्राथमिक शिक्षणाचे बाळकडू पाजले. ते अत्यंत मेहनती होते. विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी जिवाचे रान करायचे. भास्करराव आहेर सरांनी शांतता, संयम, शिस्त या गुणांची शिकवण दिली. के. डी. जोशी सरांनी शिस्तीचे धडे दिले. उच्च माध्यमिक आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे रसायनशास्त्रचे प्रा. बोथरा यांनी पुढील दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले.
आई-वडील हे माझे जीवनातील प्रथम गुरू. शिक्षण घेत असताना पुस्तकी ज्ञानाबरोबरच माणुसकीच्या जीवनाचे प्रात्यक्षिक धडे देणारे शिक्षकही मला मिळाले, हे मी माझे भाग्यच समजतो.
- डॉ. अनिल कावरखे