प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षकांची सीईओंशी चर्चा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:42 AM2021-07-27T04:42:50+5:302021-07-27T04:42:50+5:30
वाशिम : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वसुमना पंत यांच्याशी सोमवार, दि. ...
वाशिम : शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत शिक्षक कृती समितीने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) वसुमना पंत यांच्याशी सोमवार, दि. २६ जुलैरोजी चर्चा केली.
जून महिन्याचे वेतन अद्याप झाले नाही. पदोन्नतीबाबत बिंदुनामावलीची अडचण सांगण्यात येते, भविष्यनिर्वाह निधीची प्रकरणे बिडीएसच्या अडचणीमुळे निकाली निघत नाही, त्यामुळे शिक्षकांना हक्काचा पैसा मिळत नाही, वैद्यकीय परीपूर्ती देयकामधील मंजूर प्रकरणास निधी उपलब्ध नाही, निवडश्रेणी चट्टोपाध्याय प्रकरणे व पडताळणीस विलंब यासह विविध प्रश्न शिक्षक कृती समितीने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसमोर मांडले. शिक्षकांचे प्रश्न सोडविण्याबाबत कटिबद्ध असल्याची ग्वाही यावेळी पंत यांनी दिली. यावेळी शिक्षक पदाधिकाऱ्यानी सीईओ पंत यांचा सत्कारही केला. यावेळी सानेगुरुजी सेवा संघ, बहुजन शिक्षक महासंघ व महाराष्ट्र राज्य उर्दू शिक्षक संघटना व प्रहार संघटनेचे पदाधिकारी, मधुकरराव महाले, नारायणराव सरनाईक, प्रमोद गरकळ, मंचकराव तायडे, सतीश घुगे, महेंद्र खडसे, रवींद्र देशमुख, अन्निसुद्धीन, विजय सोनोने, गजानन काळे, कैसर अहेमद, राजू मते व संजय सरनाईक आदी उपस्थित होते.
०००००
वेतनाचा प्रश्न निकाली निघणार!
शिक्षकांचे वेतन दरमहा पहिल्या आठवड्यात कधीच होत नाही, हा मुद्दा शिक्षकांनी सीईओंसमोर मांडला. वेतनाबाबत कालावधी निश्चित करणार असून, याबाबत परिपत्रक काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत यांनी शिक्षकांना दिले.