सेवा समाप्तीच्या फतव्याने शिक्षक धास्तावले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2020 02:36 PM2020-02-05T14:36:39+5:302020-02-05T14:36:49+5:30
१९ जानेवारीला झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील, अशा शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सरकारने शिक्षकांनाशिक्षक पात्रता चाचणी (टीईटी) परीक्षा उत्तीर्ण असणे अनिवार्य केले आहे. न्यायालयानेही ‘टीईटी’साठी आता शेवटची संधी असून जे शिक्षक १९ जानेवारीला झालेल्या परीक्षेत अनुत्तीर्ण होतील, अशा शिक्षकांची सेवा समाप्त करण्याचे आदेश दिले आहेत. याऊपरही शाळा व्यवस्थापनाने अशा शिक्षकांना सेवेत कायम ठेवल्यास सरकार वेतन देणार नाही, अशा सूचना असल्याने जिल्ह्यातील संबंधित शिक्षक चांगलेच धास्तावले आहेत.
प्राथमिक शिक्षकांसाठी राज्य सरकारकडून ‘टीईटी’ अनिवार्य करण्यात आली आहे. दरम्यान, यंदा झालेल्या ‘टीईटी’ परीक्षेस बसलेल्या; मात्र अद्यापपर्यंत परीक्षेचा निकाल न लागलेल्या जिल्ह्यातीलही काही शिक्षकांनी सरकारच्या निर्णयास आव्हान देणाऱ्या याचिका केल्या आहेत.
संबंधितांना परीक्षेचा निकाल लागत नाही, तोपर्यंत नोकरीतून न काढण्याचा दिलासा न्यायालयाने दिला; परंतु परीक्षा उत्तीर्ण न झाल्यास त्यांनाही नोकरीतून जावेच लागणार आहे, अशी स्थिती आहे. यामुळे शिक्षक चांगलेच धास्तावले आहेत.
शिक्षक संघटनांचा आक्रमक पवित्रा
‘टीईटी’ उत्तीर्ण न होणाºया शिक्षकांना सेवेतून कमी करण्याच्या निर्णयाविरूद्ध वाशिम जिल्ह्यातील विविध शिक्षक संघटना आक्रमक झाल्या आहेत. शिक्षकांच्या हितास्तव लवकरच मोठे आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा शिक्षक महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी दिला.