समुपदेशन पद्धतीने शिक्षकांची पदस्थापना !
By Admin | Published: July 17, 2017 06:43 PM2017-07-17T18:43:39+5:302017-07-17T18:43:39+5:30
वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेल्या १४७ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर सामावून घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : आंतरजिल्हा बदली प्रक्रियेतून वाशिम जिल्ह्यात बदलून आलेल्या १४७ प्राथमिक शिक्षकांना समुपदेशन पद्धतीने जिल्हा परिषदेच्या सभागृहात जिल्हा परिषद शाळांतील रिक्त पदांवर सामावून घेण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या शिक्षकांचे आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली काढण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांकडून वारंवार झाली. शासनस्तरावर या मागणीचा सकारात्मक विचार झाल्याने आंतरजिल्हा बदली प्रकरण निकाली निघाले. या प्रक्रियेत वाशिम जिल्ह्यात एकूण २१३ शिक्षक बदलीस पात्र ठरले. २१३ पैकी १४७ शिक्षक जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात रूजू झाले आहेत. या शिक्षकांना जिल्हा परिषद शाळांमधील रिक्त जागांवर पदस्थापना देण्यासाठी सोमवारी समुपदेशन पध्दती राबविली. मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश पाटील, शिक्षण व आरोग्य सभापती सुधीर गोळे, शिक्षणाधिकारी अबादास मानकर यांच्या उपस्थितीत १४७ शिक्षकांना रिक्त पदांवर नियुक्ती देण्यात आली. समुपदेशन पध्दतीतून प्राधान्यक्रमानुसार नियुक्ती मिळाल्याने गैरप्रकारांना आळा बसला, अशा प्रतिक्रिया उमटल्या.