वर्गतुकडी वाचविण्यासाठी शिक्षकांना विद्यार्थ्यांचा शोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2019 05:38 PM2019-04-17T17:38:29+5:302019-04-17T17:38:36+5:30
वाशिम : पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी संचमान्यतेत वर्गतुकडी कमी होऊ नये यासाठी आगामी शैक्षणिक सत्रासाठी आतापासून शिक्षकांचा विद्यार्थी शोध सुरू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : पुरेशा विद्यार्थी संख्येअभावी संचमान्यतेत वर्गतुकडी कमी होऊ नये यासाठी आगामी शैक्षणिक सत्रासाठी आतापासून शिक्षकांचाविद्यार्थी शोध सुरू झाला आहे. यामधून जिल्हा परिषदेचे शिक्षकही सुटू शकले नाहीत.
दहावी, बारावीच्या परीक्षा आटोपल्या आहेत. प्राथमिक ते माध्यमिक वर्गांच्या परीक्षाही संपत आल्या आहेत. काही शाळांच्या परीक्षा संपल्या तर काही शाळांच्या परीक्षा येत्या आठवड्यात संपतील. आगामी शैक्षणिक सत्र सुरु होण्याकिरता बराच कालावधी शिल्लक आहे. मात्र, ऐनवेळी धावपळ नको म्हणून आतापासूनच खासगी संस्थाचालक, मुख्याध्यापक व शिक्षक हे विद्यार्थी शोधात असल्याचे दिसून येते. अतिरिक्त शिक्षक पद टाळण्यासाठी जिल्हा परिषदेचे शिक्षकदेखील विद्यार्थी संख्या टिकविण्याबरोबरच विद्यार्थी संख्या कशी वाढेल, या दृष्टिकोनातून प्रयत्न करीत असल्याचे सोशल मीडियावरील संदेशावरून दिसून येते.
ग्रामीण भागात प्रत्येक खेडेगावात खासगी शैक्षणिक संस्थेच्या शाळा आहेत तर वर्ग पहिली ते सातवीपर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळेच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या काही ठिकाणी वर्ग १ ते ४, काही ठिकाणी वर्ग १ ते ७ तर काही ठिकाणी वर्ग १ ते १२ वीपर्यंतदेखील शाळा आहेत. अलिकडच्या काळात ग्रामीण भागात शाळा जास्त व विद्यार्थी कमी असे चित्र निर्माण होत आहे. त्यामुळे शाळेतील आवश्यक विद्यार्थी संख्या टिकविण्याकरिता शिक्षकांना विद्यार्थी संख्येकडे कटाक्षाने लक्ष द्यावे लागत आहे. शाळेतील एका वर्गतुकडीत नियमाप्रमाणे पटसंख्या नसल्यास ती तुकडी रद्द होवून शिक्षक सुध्दा अतिरिक्त ठरतो. त्यामुळे तुकडी व नोकरी वाचविण्याकरिता शिक्षकांना आवश्यक विद्यार्थी संख्येचा भरणा करण्याशिवाय पर्याय उरत नाही. स्वत:च्या शाळेतील विद्यार्थीसंख्या टिकविण्याबरोबरच जास्त विद्यार्थी कसे मिळतील, या दृष्टिकोनातून शिक्षकांतर्फे विद्यार्थी शोध घेतला जातो. विशेषत: खासगी शाळांमध्ये भौतिक सुविधा कशा दर्जेदार आहेत, आमचीच शाळा कशी प्रगत आहे, हे पालकांना पटवून देण्याचा प्रयत्न शिक्षकांकडून होत असल्याचे दिसून येते.
जिल्हा परिषद शाळांमध्ये भौतिक सुविधा उपलब्ध करण्यावर सर्वाधिक भर दिला जात आहे. वाशिम तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या अनेक शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचाविला आहे. साखरा येथील जिल्हा परिषदेच्या शाळेला तर आंतरराष्ट्रीय ओजस शाळेचा दर्जा मिळालेला आहे. जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थी संख्या कायम ठेवण्याबरोबरच विद्यार्थी संख्या कशी वाढेल, या दृष्टिने प्रयत्न सुरू आहेत.
- गजानन बाजड
गटशिक्षणाधिकारी, वाशिम