शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 04:38 AM2021-07-26T04:38:01+5:302021-07-26T04:38:01+5:30
गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता त्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच ...
गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद होत्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले. आता त्यांच्या मनात शाळेविषयी आवड निर्माण करण्यासाठी तसेच नियमित अभ्यासांचे धडे शिकविण्यासाठी शाळेतील वर्गशिक्षकांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी पालक वर्गातून होत आहे, परंतु अनेक शाळांमधील शिक्षक हे मुख्यालयी राहत नाहीत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अडचणी निर्माण होत आहेत. शिक्षकांनी मुख्यालयी राहिल्यास विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी अडचण जाणार नाही. पूर्वी ग्रामीण भागात शिक्षक हे मुख्यालयी राहत होते. त्यामुळे विद्यार्थी आणि शिक्षक यांच्यात समन्वय राहत होता. काही अडचणी असल्यास विद्यार्थी शिक्षकांच्या घरी जाऊन त्या सोडून घेत होते, परंतु मागील काही वर्षापासून अनेक शिक्षकांनी शहरात राहणे पसंत केल्यामुळे विद्यार्थ्यांना काही प्रश्न निर्माण झाले तर त्यांना दुसऱ्या दिवशी शिक्षक गावात येईपर्यंत वाट पाहावी लागत आहे. शिक्षणाधिकाऱ्यांनी ही बाब लक्षात घेत शिक्षकांना मुख्यालयी राहण्याची सक्ती करावी, अशी मागणी पालकवर्गातून केली जात आहे.
-----------
नियंत्रण मिळविणार कोण?
रिसोड तालुक्यातील अनेक शाळांतील शिक्षकांनी आपल्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी शहरात राहणे पसंत केले आहे, परंतु ज्या शाळेत ते शिक्षणाचे धडे शिकवत आहेत त्या विद्यार्थ्यांचे मात्र नुकसान होत आहे. त्यात ग्रामीण भागातील अनेक गावांमध्ये रस्ते खराब असल्यामुळे शिक्षकांना शाळेत जाण्यास उशीर होत असतो, परंतु शाळेतील मुख्याध्यापकांसह सर्वच शिक्षक अपडाऊन करत असल्यामुळे कोणीच यावर नियंत्रण मिळविण्याचे प्रयत्न करीत नाहीत.
------------------
कोट : शिक्षकांनी मुख्यालयी राहणे आवश्यक आहे. त्यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यासाठी शाळा समितीने पुढाकार घ्यावा, तसेच पालकांनीही तक्रारी केल्यास यावर निश्चित उपाययोजना करता येतील.
- रमेश तांगडे, शिक्षणाधिकारी (माध्यमिक), जि.प. वाशिम