अनुदानासाठी शिक्षक आमदारांच्या दारात ठिय्या आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2021 04:47 AM2021-08-20T04:47:41+5:302021-08-20T04:47:41+5:30
सर्व अघोषित, घोषित, त्रुटी, अपात्र आणि अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना १०० टक्के प्रचलित सूत्रानुसार अनुदान मिळणे अपेक्षित असताना, नियमानुसार ...
सर्व अघोषित, घोषित, त्रुटी, अपात्र आणि अंशत: अनुदानित शाळेतील शिक्षकांना १०० टक्के प्रचलित सूत्रानुसार अनुदान मिळणे अपेक्षित असताना, नियमानुसार अनुदान नाही. प्रचलित नियमानुसार विनाअनुदानित शाळेतील शिक्षक १०० टक्के अनुदानासाठी पात्र असताना अनेक शाळांतील शिक्षकेतर कर्मचारी व शिक्षकांना २० टक्के, तर काहींना ४० टक्के वेतन मिळत आहे, तर अनेक शिक्षकांना अद्याप वेतन मिळत नाही. या गंभीर प्रश्नाकडे शासनाचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीतर्फे अमरावती विभागीय शिक्षक मतदारसंघाचे आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांच्या वाशिम येथील सिव्हिल लाइनस्थित घरासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला पाठिंबा दर्शवीत आमदार सरनाईकदेखील आंदोलनात सहभागी झाले. यावेळी पालकमंत्री शंभुराज देसाई यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. यावेळी खासदार भावना गवळी, आमदार अमित झनक, जिप अध्यक्ष डॉ. श्याम गाभणे, प्राचार्य अरुण सरनाईक, विनाअनुदानित कृती समितीचे विभागीय अध्यक्ष सुधाकर वाहुरवाघ यांच्यासह कायम विनाअनुदानित शाळा कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांची बहुसंख्येने उपस्थिती होती. या आंदोलनाला शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या विविध संघटनांनी पाठिंबा दिला.
०००००
मी शिक्षकांचा आमदार -सरनाईक
ठिय्या आंदोलनादरम्यान आमदार ॲड. किरणराव सरनाईक यांनी शिक्षकांच्या व्यथा जाणून घेतल्या. मी एक अपक्ष आमदार असल्यामुळे कुठल्याही पक्षाचा नाही. मी फक्त शिक्षकांचा आमदार असून, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समस्या शासन दरबारी मांडून त्या सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याची ग्वाही यावेळी आमदार ॲड. सरनाईक यांनी कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांना दिली.