कोविड विमा लाभापासून राज्यातील शिक्षक वंचित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:41 AM2021-04-22T04:41:45+5:302021-04-22T04:41:45+5:30
कोविड सेवेत कार्यरत असताना राज्यातील अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत असताना शिक्षकांना ...
कोविड सेवेत कार्यरत असताना राज्यातील अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत असताना शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आता कोविड विम्याचा लाभ न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मात्र उघड्यावर पडले आहेत. शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना मात्र लाभ मिळाले आहेत हे विशेष. महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेने याबाबत राज्यभरातून ऑनलाईन माहिती मागविली आहे. त्यात सर्वाधिक बाधित १०१ शिक्षक नागपूर जिल्ह्यातील आहेत, तर सर्वाधिक १२ मृत्यू धुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे झाले आहेत. जिल्हावार मृत शिक्षकांची संख्या कमीअधिक आहे.
यापैकी कोणालाच ५० लाखांच्या विम्याचा लाभ मिळाला नाही, असे त्यांच्या परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आहे, असे निवेदनात नमूद आहे. तसेच याउपरही शिक्षकांची सेवा कोविडसाठी घेणे सुरूच आहे. त्यामुळे शिक्षकांची सेवा घेण्यापूर्वी प्रत्येक कोविड दवाखान्यात कोविड योद्ध्यांकरिता बेड राखीव असावेत, कोविड सेवा देताना पॉझिटिव्ह आल्यास पुनःश्च कोविड ड्युटी देण्यात येऊ नये, अतिगंभीर आजारग्रस्त, दिव्यांग यांना अशा सेवेतून वगळावे या मागण्या संघटनेने केल्या आहेत.
विमा रक्कम न मिळाल्याच्या गंभीर समस्येची दखल घेऊन पीडित शिक्षक परिवारांना तत्काळ न्याय प्रदान करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभाग प्रधान सचिव गिरीश व्यास यांना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्य अध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर यांनी केली आहे. वाशिम जिल्ह्यातसुद्धा जिल्हाध्यक्ष इरफान मिर्झा, अरुण बाकल, प्रशांत बिजवे, प्रदीप वनारसे, बंडूभाऊ गावंडे, प्रदीप गावंडे, आदी पुरोगामी शिक्षक संघटनेच्या पदाधिकारी मंडळीच्या वतीने मागणी करण्यात आली आहे.