विद्यार्थ्यांच्या नवोदय परीक्षा सरावासाठी शिक्षकांची धडपड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:49+5:302021-03-26T04:41:49+5:30
कोरोना संसर्गामुळे मागील वर्षभरापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्षभरापासून शाळा बंद असल्याने शैक्षणिक नुकसानात अधिकच ...
कोरोना संसर्गामुळे मागील वर्षभरापासून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत आहे. वर्षभरापासून शाळा बंद असल्याने शैक्षणिक नुकसानात अधिकच भर पडली. अशातच नवोदय प्रवेश परीक्षा जवळ येऊन ठेपली. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून शिरपूरपासून जवळच्या असलेल्या केशवनगर येथील बाबासाहेब धाबेकर विद्यालयाचे शिक्षक आर. एम. पगार, पांडुरंग खंडारे व कैलास साबळे यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी नवोदय प्रवेश परीक्षेस यशस्वी व्हावे म्हणून परीक्षा पूर्व सराव पेपर घेण्याचे ठरविले. शासनाने अगोदरच शाळा उघडण्यास मनाई केली आहे. त्यामुळे शिकवणी सराव पेपर घेण्यात अडचणी निर्माण झाल्या. मात्र, या शिक्षकांनी ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणात मागे राहू नये, नवोदयसाठी त्यांची निवड व्हावी या भावनेतून दापुरी येथे एका झाडाखाली दहा ते पंधरा विद्यार्थ्यांचा समूह करून कोरोना नियमांचे पालन करीत त्यांना याविषयी मार्गदर्शन शिक्षण देण्याचे काम करीत आहेत. तसेच नवोदय प्रवेश पूर्व सराव परीक्षासुद्धा घेत आहेत. त्यांच्या या भूमिकेचे पालक वर्गातून स्वागत करण्यात येत आहे.
_____________
कोट :
दापुरी हे गाव केशवनगरपासून ३ कि.मी. दूर आहे. त्यात रखरखते ऊन आणि कोरोनाचा धोका ही बाब लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना येण्या-जाण्याचा त्रास होऊ नये, वाहनातून प्रवास करताना कोरोनाचा संसर्ग होऊ नये, म्हणून त्यांना गावात जाऊन मार्गदर्शन, शिक्षण देऊन सराव पेपर घेत आहोत.
रा. मु. पगार, शिक्षक बाबासाहेब धाबेकर विद्यालय केशवनगर या.रिसोड.