महामार्गावरील खड्डे बुजविण्यासाठी शिक्षक, विद्यार्थी रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 12, 2018 04:52 PM2018-10-12T16:52:53+5:302018-10-12T16:53:08+5:30
विद्यार्थी व शिक्षकांनीच धोकादायक ठरणारे खड्डे बुजविण्यासाठी शुक्रवारी पुढाकार घेतला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम - वाशिम तालुक्यातील पार्डी टकमोर येथील फाट्यालगत असलेल्या महामार्गावरील खड्डे बुजविण्यासंदर्भात निवेदन देऊनही रस्ते विकास महामंडळ, बांधकाम विभागाने दखल घेतली नाही. शेवटी विद्यार्थी व शिक्षकांनीच धोकादायक ठरणारे खड्डे बुजविण्यासाठी शुक्रवारी पुढाकार घेतला.
वाशिम ते नागपूर या महामार्गावर पार्डी टकमोर फाटा असून, पार्डी टकमारे येथील पारेश्वर विद्यालयात परिसरातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी सायकल, आॅटो व अन्य वाहनाने येतात. पार्डी टकमोर फाट्यानजीक रस्त्यावर खड्डे असल्याने अपघाताच्या किरकोळ घटना घडतात. खड्डे बुजविण्यासाठी यापूर्वी स्थानिक नागरिकांनी सार्वजनिक बांधकाम उपविभाग वाशिमला निवेदनही दिले होते. रस्ते विकास महामंडळाकडेही निवेदन दिले होते. त्यावेळी रस्ते विकास महामंडळाचे अभियंता रवि मालवत यांनी लवकरच खड्डे बुजविले जातील, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यांनाही आश्वासनाचा विसर पडला. दोन्ही निवेदनाची दखल घेण्यात आली नसल्याने शेवटी पारेश्वर विद्यालयाचे शिक्षक महेश उगले, गजानन चौधरी, मोहन चौधरी यांच्यासह विद्यार्थ्यांनी शुक्रवारी धोकदायक ठरणारे खड्डे बुजविले.