पाचवी व आठवीचा वर्ग जोडण्यासाठी शिक्षक संघटनांचे साकडे
By admin | Published: May 5, 2017 07:21 PM2017-05-05T19:21:58+5:302017-05-05T19:21:58+5:30
जिल्हा परिषद शाळेला पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण सभापती सुधीर पाटील गोळे यांच्याकडे शुक्रवारी केली.
वाशिम : जिल्ह्यातील अनेक प्राथमिक व उच्च प्राथमिक शळामध्ये इयत्ता ४ थी व ७ वी मध्ये योग्य पटसंख्या असतांनासुध्दा इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग जोडण्यात आलेले नाहीत. जिल्हा परिषद शाळेला पाचवी व आठवीचे वर्ग जोडण्याची मागणी विविध शिक्षक संघटनांनी शिक्षण सभापती सुधीर पाटील गोळे यांच्याकडे शुक्रवारी केली.
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियमन २००९ अंतर्गत शिक्षणाची सोय उपलब्ध करुन देण्याचे शासनावर बंधनकारक आहे. तसेच नवीन शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता १ ली ते पाचवीपर्यंत प्राथमिक व इयत्ता ६ वी ते ८ वी पर्यंत उच्च प्राथमिक असा स्तर निश्चित करण्यात आलेला आहे. यानुसार चवथ्या वर्गाला पाचवा वर्ग जोडणे आणि सातव्या वर्गाला आठवा वर्ग जोडणे गरजेचे आहे. जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये इयत्ता पाचवी आणि आठवी सुरु करण्यास विलंब होत असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला. शिक्षण विभागाने नवे वर्ग निर्मितीचा प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षण समितीकडे सादर करण्याची मागणी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केली. गतवर्षी तोंडी सुचना देवुन ग्राम शिक्षण समिती, शाळा व्यवस्थापन समितीच्या ठरावानुसार काही शाळांमध्ये इयत्ता आठवी व पाचवीचे वर्ग सुरु झाले. इतर ठिकाणी सदर वर्ग सुरू करावे यासंदर्भात सभापती गोळे यांच्याशी चर्चा करण्यात आली. सद्यस्थितीत अतिरिक्त शिक्षकांची संख्या वाढली आहे. वर्गजोड करण्यात आली तर शाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढुन शिक्षक अतिरिक्त होणार नाहीत व विद्यार्थ्यांना सुध्दा स्वगावी शिक्षण घेता येईल, हा मुद्दा शिक्षकांनी पटवून दिला. काही दिवसांपुर्वी जिल्हयातील जवळपास ३५० शिक्षकांच्या विषय शिक्षक म्हणुन उच्च प्राथमिक शाळांवर नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्या शिक्षकांना विषयाची वाटणी, वर्कलोड व तासिकांचे नियोजन यासाठी वर्ग ६ ते ८ अशी रचना आवश्यक आहे. या सर्व बाबी विचारात घेता जिल्ह्यातील सर्वच शाळांमधये इयत्ता ५ वी व ८ वीचे वर्ग सुरु करण्याबाबत शिक्षक संघटनांच्या कृती समितीने शिक्षण सभापती सुधीर गोळे यांची भेट घेवुन चर्चा केली. या शिष्टमंडळात विजय मनवर, देवबा शिंदे, विनोद राजगुरु, दत्तराव इढोळे, पुरुषोत्तम तायडे, हेमंत तायडे, संतोष शिकारे, रा.सु.इंगळे, किसन राजे, शत्रुघ्न गवळी, राहुल इंगोले, अनिल पाटील, खुशाल राऊत यांचेसह शिक्षकांची उपस्थिती होती.