ग्रीन आर्मी अंतर्गत शिक्षकांचीही नोंदणी होणार !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2018 03:50 PM2018-04-10T15:50:25+5:302018-04-10T15:50:25+5:30
वाशिम - १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा एक भाग असलेल्या ग्रीन आर्मी अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची नोंदणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिल्या.
वाशिम - १३ कोटी वृक्ष लागवड मोहिमेचा एक भाग असलेल्या ग्रीन आर्मी अंतर्गत जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षकांची नोंदणी करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी दीपककुमार मीणा यांनी दिल्या. त्या अनुषंगाने शिक्षकांची नोंदणी केली जात असल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी अंबादास मानकर यांनी मंगळवारी दिली.
शासनस्तरावरुन एकीकडे वृक्ष लागवड, संवर्धनावर विशेष भर दिला जात असताना दुसरीकडे मात्र काही समाजविघातक प्रवृत्तींकडून वृक्षांची सर्रास कत्तल केली जात आहे. त्यावर नियंत्रण मिळविण्यासाठी तसेच वृक्ष लागवड व संवर्धन या मोहिमेला हातभार लागावा यासाठी ‘ग्रीन आर्मी’ अर्थात हरित सेनेचे सदस्य म्हणून नोंदणी केली जाते. ही नोंदणी ऐच्छिक असून, कुणीही नोंदणी करू शकतो. शक्यतोवर विद्यार्थ्यांकडून अधिक प्रमाणात नोंदणी करून घेतली जाते. वाशिम जिल्ह्यात वाशिम-रिसोड, मेडशी-मालेगाव आणि कारंजा-मानोरा असे तीन वनपरिक्षेत्र असून २४ हजार ४९८ हेक्टर क्षेत्र वनाच्छादित आहे. वनांचा हा परिसर सागवानसह विविध वृक्षांनी व्यापलेला आहे. दरम्यान, वनांमधील वृक्षतोडीवर नियंत्रण मिळवून वृक्षसंवर्धन, संगोपन व्हायला हवे. यासह वृक्षलागवडीवर विशेष भर देण्याचे शासनाचे स्पष्ट निर्देश आहेत. मोठमोठ्या वृक्षांच्या होणाºया बेसुमार कत्तलीवर नियंत्रण मिळविणे तसेच वृक्ष लागवड व संवर्धन याकरिता प्रशासकीय पातळीवरून विविध उपक्रम हाती घेण्यात आले आहेत. ग्रीन आर्मी याअंतर्गत जिल्ह्यातील तीनही वनपरिक्षेत्रांतर्गत ‘आॅनलाईन’ नोंदणी करण्यात येत आहे. या मोहिमेत आता शिक्षक व जिल्हा परिषदेच्या कर्मचाºयांनाही सहभागी करून घेण्याचा संकल्प मुख्य कार्यकारी अधिकार दीपककुमार मीणा यांनी केला आहे. त्या अनुषंगाने शिक्षक व कर्मचाºयांनी ग्रीन आर्मी म्हणून नोंदणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. ग्रीन आर्मी मोबाईलवर प्रत्येक कर्मचारी व शिक्षकांनी स्वत:सह कुटुंबातील सदस्यांची नोंदणी करावी तसेच सर्व शिक्षक संवर्गातील कर्मचाºयांची नोंदणी होईल, याबाबत गटशिक्षणाधिकाºयांनी कार्यवाही करावी अशा सूचना मीणा यांनी दिल्या.
आमदारांनी केली नोंदणी
‘ग्रीन आर्मी’ या उपक्रमांतर्गत आमदार अमित झनक यांनी ९ एप्रिल रोजी जिल्हा परिषदेत जाऊन आॅनलाईन नोंदणी केली. वृक्ष लागवड मोहिमेत सर्वांनी योगदान द्यावे, असे आवाहन झनक यांनी केले.