तहसिलदारांचे काम बंद; महसूल यंत्रणा प्रभावित
By संतोष वानखडे | Published: April 3, 2023 12:58 PM2023-04-03T12:58:09+5:302023-04-03T12:58:16+5:30
यामध्ये जिल्ह्यातील १० तहसिलदार, २५ नायब तहसिलदार सहभागी झाल्याने महसूल यंत्रणा प्रभावित झाल्याचे पाहावयास मिळाले.
वाशिम: नायब तहसिलदार, तहसिलदार पदाला वर्ग दोनचा दर्जा असतानाही वेतनश्रेणी वर्ग तिनची लागू असल्याने, हा अन्याय दूर करण्यासाठी ३ एप्रिलपासून नायब तहसिलदार, तहसिलदार संघटनेने राज्यव्यापी बेमुदत कामबंद आंदोलन पुकारले आहे. यामध्ये जिल्ह्यातील १० तहसिलदार, २५ नायब तहसिलदार सहभागी झाल्याने महसूल यंत्रणा प्रभावित झाल्याचे पाहावयास मिळाले.
नायब तहसिलदार, तहसिलदार पदाचा दर्जा वर्ग दोनचा करण्यात आला. मात्र, वेतनश्रेणी वर्ग तीनच्या पदाची देण्यात येते.
वेतनश्रेणीत सुधारणा करून नायब तहसिलदारांना राजपत्रित वर्ग -२ चे ४,८०० रुपयांचे ग्रेड पे लागू करावे, या मागणीसाठी नायब तहसिलदार, तहसिलदार संघटनेने सन १९९८ पासून लढा उभारला आहे. मात्र, मागणीची दखल शासनाने घेतली नसल्याने संघटनेने आक्रमक पवित्रा घेत ३ एप्रिलपासून राज्यव्यापी कामबंद आंदोलनाची हाक दिली होती. याला वाशिम जिल्ह्यात १०० टक्के प्रतिसाद मिळाला असून, पहिल्या दिवशी सोमवारी (दि.३) वाशिम येथे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात पेंडाॅल टाकून आंदोलन करण्यात आले.