रस्ता खोदकामात केबल तुटल्याने दूरध्वनी, इंटरनेट सेवा कोलमडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2019 03:51 PM2019-12-16T15:51:48+5:302019-12-16T15:52:06+5:30
गत काही दिवसांपासून मानोरा शहर व परिसरात संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याचे खोदकाम केले जात आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
मानोरा : गत काही महिन्यांपासून आर्णी ते अकोला या राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू आहे. त्यासाठी जेसीबी मशीनव्दारे रस्ते खोदण्यात आले असून त्यात भूमिगत केबल तुटल्याने मानोरा शहरातील दुरध्वनी व इंटरनेट सेवा बहुतांशी कोलमडली आहे. याशिवाय रस्त्याचे काम करताना पाण्याच्या वापराकडे दुर्लक्ष केले जात असल्याने उडणाऱ्या धुळीच्या त्रासालाही नागरिक पुरते वैतागले आहेत.
राष्ट्रीय महामार्ग निर्मितीदरम्यान गत काही दिवसांपासून मानोरा शहर व परिसरात संबंधित कंत्राटदाराकडून रस्त्याचे खोदकाम केले जात आहे. यादरम्यान भारत संचार निगमसह अन्य खासगी मोबाईल कंपन्यांनी टाकलेले भूमिगत केबल तुटले आहेत. परिणामी, दुरध्वनी सेवेसोबतच इंटरनेट सेवाही कोलमडल्याने बँका, शासकीय कार्यालयांमधील कामकाज प्रभावित होत आहे. दुसरीकडे रस्ता खोदून ठेवल्यानंतर बरेच दिवस तो पूर्ण करण्याकडे लक्ष दिले जात नसल्याचाही प्रकार घडत आहे. यामुळे सर्वत्र धुळीचे प्रमाण वाढले असून रस्त्यालगत व्यवसाय असणाºया दुकानदारांची त्रेधातिरपीट उडत आहे. वाहनचालकांना नाकातोंडाला रुमाल बांधल्याशिवाय बाहेर पडता येणे अशक्य झाले आहे. या समस्येकडे संबंधित यंत्रणेने लक्ष पुरवून रस्ता कामाची गती वाढवावी, धुळीचे प्रमाण कमी करण्यासाठी पाण्याचा वापर करावा, अशी मागणी होत आहे.
(प्रतिनिधी)