काेराेना नियमांचे पालन करीत मंदिरे उघडायला हवीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:29 AM2021-09-02T05:29:35+5:302021-09-02T05:29:35+5:30
नंदकिशोर नारे वाशिम : मंदिरे उघडावीत अशी सर्वच भाविकांची इच्छा आहे. भाजपानेसुद्धा मंदिरे उघडावीत यासाठी राज्यभर आंदाेलन केले. ...
नंदकिशोर नारे
वाशिम : मंदिरे उघडावीत अशी सर्वच भाविकांची इच्छा आहे. भाजपानेसुद्धा मंदिरे उघडावीत यासाठी राज्यभर आंदाेलन केले. परंतु इतर राजकीय पक्षांचे काय मत आहे याची माहिती लाेकमतने जाणून घेतली असता, मंदिरे उघडायला हरकत नाही, परंतु काेराेना नियमांच्या पालनात असा सूर दिसून आला.
काेराेनामुळे बंद असलेली मंदिरे अजूनही बंद असल्याने भाविकांमध्ये एकीकडे नाराजीचा सूर दिसून येत असला तरी आराेग्यही महत्त्वाचे असल्याने शासनाने घेतलेला निर्णय याेग्यच असावा. परंतु, एकीकडे बार, रेस्टाॅरंट, रेल्वे, बस या ठिकाणी गर्दी हाेत असताना हे सुरू करण्यात आले आहे मग मंदिरेच का बंद? असा प्रश्नही काही जण करताना दिसून येत आहेत. प्रत्येक भाविकास आपल्या आराेग्याची काळजी आहेच. मंदिरात जाताना ताे काेराेना संसर्ग हाेऊ नये याकरिता खबरदारी घेणार यात दुमत नाही. तरी शासनाने काेराेना नियमांचे पालन करीत मंदिरे उघडी केल्यास भाविकांत नवचैतन्य निर्माण हाेणार असल्याचे काहींनी सांगितले. तर काहींनी शासन घेत असलेले निर्णय याेग्य आहेत, असे सांगितले.
.................
काेराेना नियमांचे पालन बंधनकारक करून मंदिरे उघडावीत - शिवसेना
भाविकांची इच्छा पाहता काेराेना नियमांचे पालन बंधनकारक करून मंदिरे उघडण्यास हरकत नाही. त्याकरिता मंदिर विश्वस्तांना नियमांच्या सूचना द्याव्यात.
सुरेश मापारी, जिल्हाध्यक्ष, शिवसेना
केंद्रशासनाच्या निकषानुसार निर्णय - काँग्रेस
केंद्रशासनाच्या निर्णयानुसार राज्यशासन सूचनांचे पालन करीत आहे. राज्यशासन मंदिराबाबतचे जे निर्णय घेत आहे, ते नागरिकांच्या आराेग्याच्या हिताचे आहेत.
_ अमित झनक, जिल्हाध्यक्ष, काँग्रेस
नियमांचे पालन हाेत असेल तर उघडा - राष्ट्रवादी
नागरिकांच्या आराेग्याची काळजी घेता शासन घेत असलेले निर्णय याेग्य आहेत. नियमांचे पालन हाेत असेल तर मंदिरे उघडण्यास हरकत नाही. पण नियमांचे पालन आवश्यक आहे.
- चंद्रकांत ठाकरे, जिल्हाध्यक्ष, रा.काँ.
मंदिरे उघडावीत - भाजप
शासनाने गर्दीची सर्व ठिकाणे खुली केली. मग मंदिरेच का बंद? मंदिरावर अवलंबून असलेले अनेक व्यावसायिक उपासमारीत जीवन जगत आहेत. भाविक नाराज आहेत. त्याकरिता मंदिरे उघडावीत.
- राजेंद्र पाटणी, जिल्हाध्यक्ष, भाजपा
................
हजार कोटींची उलाढाल
मंदिरे बंद असल्याने प्रसादालये बंद आहेत. प्रसाद बनविणाऱ्यांचे हात थांबले. दरराेज एका मंदिरासमाेर किमान एक हजार रुपयांच्या प्रसादाची विक्री व्हायची ती पूर्णपणे थांबली आहे. यामधून हजाराे रुपयांची उलाढाल थांबल्याचे दिसून येत आहे.
मंदिरे बंद असल्याने फुलांचे भाव मातीमाेल झाले आहेत. फुलांना पाहिजे त्या प्रमाणात मागणी नसल्याने फुलांची विक्री थांबली आहे. फुलांपासून हार बनविणाऱ्यांचे हात थांबले आहेत. कसेबसे हारफुले विक्री करून आपला उदरनिर्वाह करणाऱ्यांवर उपासमार आली आहे
....
विश्वस्त म्हणतात....
मंदिर बंद असल्याने भक्तिमय वातावरण संपुष्टात आल्याचे दिसून येत आहे. दरराेज मंदिरात असणारी गर्दी राहिली नाही. यामुळे बऱ्याच व्यावसायिकांचेही नुकसान हाेत आहे. शासनाने काेराेना त्रिसूत्रीचे पालन करीत मंदिर उघडण्यास परवानगी द्यायला पाहिजे.
- विरेंद्र वाटाणे
श्री. स्वामी समर्थ मंदिर, वाशिम
अनेक महिन्यांपासून बंद असलेले मंदिर उघडून भाविकांना दिलासा देणे गरजेचे आहे. सर्व सण, उत्सव काेराेनामुळे बंद आहेत. परंतु इतर गर्दीची ठिकाणे काेराेना नियमांचे पालन करीत उघडली. तेच नियम लागू करून मंदिरे उघडण्याचा निर्णय घ्यावा.
- दयाराम राऊत
विश्वस्त, श्री गजानन महाराज मंदिर, वाशिम