नवरात्रौत्सवासाठी मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरती वीजजोडणी
By दादाराव गायकवाड | Published: September 23, 2022 04:56 PM2022-09-23T16:56:47+5:302022-09-23T16:57:04+5:30
वाशिम जिल्ह्यातही या योजनेची अमलबजावणी होत असून मंडळांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
वाशिम : येत्या सोमवारपासून नवरात्र उत्सवाला सुरूवात होत आहे. या उत्सवादरम्यान सार्वजनिक नवरात्र उत्सव मंडळांना सवलतीच्या दराने तात्पुरत्या स्वरूपात अधिकृत वीजजोडणी देण्याची तयारी महावितरणने केली आहे. वाशिम जिल्ह्यातही या योजनेची अमलबजावणी होत असून मंडळांनी या सवलतीचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणने केले आहे.
नवरात्र उत्सव सर्वत्र २६ सप्टेंबरपासून उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. महावितरणकडून नवरात्र उत्सव मंडळांना घरगुती वीज ग्राहकांप्रमाणेच पहिल्या १०० युनिटसाठी केवळ ४ रूपये ७१ पैसे प्रति युनिट, १०१ ते ३०० युनिटसाठी ८ रुपये ६९ पैसे प्रति युनिट, ३०१ ते ५०० प्रती युनिट वीज वापरासाठी ११ रुपये ७२ पैसे प्रति युनिट आणि ५०० युनिटपेक्षा अधिकच्या वीज वापरासाठी १३ रुपये २१ पैसे दराने वीजपुरवठा देण्यात येणार असून, मंडळांनी अनधिकृत विजेचा वापर केल्यास भारतीय विद्युत अधिनियम २००३ नुसार कारवाई करण्यात येणार आहे.
वाशिम जिल्ह्यातही या योजनेची अमलबजावणी केली जात असून, याचा लाभ घेण्याचे आवाहन महावितरणच्या वाशिम येथील अधीक्षक अभियंता मंगेश वैद्य, कार्यकारी अभियंता रत्नदीप तायडे यांच्यासह महावितरणचे जनसंपर्क अधिकारी पी. एम. राठोड यांनी केले आहे.