दहा हजार पशुधनाची निगा प्रभारींच्या खांद्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 04:54 AM2021-06-16T04:54:09+5:302021-06-16T04:54:09+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिरपूर जैन : जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची वानवा असून, अनेक पदे रिक्त आहेत. त्यात दहा हजारांहून ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन : जिल्ह्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांची वानवा असून, अनेक पदे रिक्त आहेत. त्यात दहा हजारांहून अधिक पशुधन असलेल्या शिरपूर पशुधन केंद्रात मागील ३२ महिन्यांपासून कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकारी नाही. सप्ताहाभरात केवळ दोनच दिवस प्रभारी अधिकारी भेट देत असल्याने पशुधनाचे आरोग्य संकटात आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पशुधन असलेल्या पशुवैद्यकीय केंद्रात शिरपूर पशुवैद्यकीय केंद्राचा समावेश आहे. या पशुवैद्यकीय केंद्रांतर्गत दहा हजारांहून अधिक पशुधन आहे. मात्र पशुधनाची निगा राखण्यासाठी या ठिकाणी मागील ३२ महिन्यांपासून नियमित पशुधन विकास अधिकारीच नाही. ऑक्टोबर २०१८ मध्ये डॉ. स्वप्नील महाळंकर यांची बदली झाली. त्यानंतर येथे पशुधन विकास अधिकारीच रुजू झाले नाहीत. नियमित पशुवैद्यकीय अधिकारी मिळावा म्हणून विविध आंदोलनेही पशुपालक शेतकऱ्यांनी केली. त्यानंतर जिल्हा परिषदने येथे प्रभारी पशुधन विकास अधिकाऱ्यांची नियुक्ती केली. यात रिठद, मेडशी आणि अनसिंग येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी नियुक्तीनुसार आठवड्यात काही दिवसापर्यंत दोन दोन दिवस प्रभार सांभाळला. अद्यापही येथे नियमित पशुवैद्यकीय अधिकारी नसून प्रभारी पशुवैद्यकीय अधिकारी आठवड्यात केवळ दोनच दिवस पशुवैद्यकीय केंद्राला भेट देत आहेत. नियमित पशुवैद्यकीय अधिकारी नसल्याने पशुपालकांना खासगी पशुचिकित्सकांची खर्चिक सेवा घ्यावी लागत आहे. एकीकडे चालते फिरते पशुवैद्यकीय केंद्र सुरू करणाऱ्या पशुसंवर्धन विभागाने नवीन पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची भरती न केल्याने ग्रामीण भागातील पशुवैद्यकीय केंद्र पशुवैद्यकीय अधिकारऱ्यांविना ओस पडली आहेत.
---------
एका अधिकाऱ्याकडे चार केंद्रांचा प्रभार
जिल्ह्यात पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त असल्याने ती भरण्याची कार्यवाही पशुसंवर्धन विभागाकडून होणे अपेक्षित आहे; परंतु त्याची तसदी न घेता एकाच अधिकाऱ्याकडे अतिरिक्त प्रभार सोपविण्याचे काम पशुसंवर्धनकडून केले जात आहे. त्यात रिठद येथील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडे रिठदसह केनवड, मेडशी आणि शिरपूर पशुवैद्यकीय केंद्रांचा प्रभार सोपविण्यात आला आहे.
-----
मालेगाव तालुक्यात सहा पदे रिक्त
मालेगाव तालुक्यात मालेगाव, शिरपूर, मेडशी, राजा किन्ही हे प्रथमश्रेणी पशुवैद्यकीय केंद्र आहेत. या चारही ठिकाणची पशुवैद्यकीय अधिकारी पदे रिक्त आहेत. प्रथमश्रेणी पशुवैद्यकीय केंद्रांचा कारभार प्रभारींच्या खांद्यावर आहे. त्याशिवाय खंडाळा, करंजी, मुंगळा, पांगराबंदी, राजुरा व जऊळका हे उपकेंद्र असून, यातील राजुरा, जऊळका येथील पदे रिक्त आहेत.
---------
कोट
शिरपूरसह तालुक्यातील एकाही प्रथमश्रेणी पशुवैद्यकीय केंद्रात कायमस्वरूपी पशुधन विकास अधिकार नाही. ही अतिशय गंभीर बाब असून, शासनाने तात्काळ नवीन पशुवैद्यकीय अधिकारी नेमणूक करावी.
-बळीबापू देशमुख. पशुपालक शिरपूर जैन
---------------
कोट
जिल्ह्यातील १७ प्रथमश्रेणी पशुवैद्यकीय केंद्रांपैकी १३ केंद्रांतील पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. पशुसंवर्धन आयुक्त कार्यालयाला माहिती देऊन रिक्त पदावर पशुवैद्यकीय अधिकारी नेमणूक करण्याची मागणी करण्यात आली आहे.
-विनोद वानखेडे
जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, वाशिम