'चित्रकले'च्या वाढीव गुणांना दहावीचे विद्यार्थी मुकणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2021 04:08 PM2021-01-14T16:08:18+5:302021-01-14T16:08:39+5:30
Washim News विहित मुदतीत प्रस्ताव सादर करू न शकणाºया विद्यार्थ्यांना वाढीव गुणांना मुकावे लागणार आहे.
- संतोष वानखडे
वाशिम : चित्रकला विषयातील एलिमेंटरी, इंटरमिजिएट परीक्षा प्राविण्य क्षेणीत उत्तीर्ण करणाºया विद्यार्थ्यांना दहावीच्या निकालात सवलतीचे वाढीव गुण मिळतात. २०२० मध्ये कोरोनामुळे इंटरमिजिएट परीक्षा झाली नसल्याने आणि २०१९ मधील ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र बहुतांश शाळांपर्यंत पोहचले नसल्याने १५ जानेवारीपर्यंत विभागीय मंडळांकडे प्रस्ताव सादर कसे करावे? असा पेच विद्यार्थ्यांसह कला शिक्षकांना पडला आहे.
२०२० मध्ये मार्च महिन्यापासून देशात कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव वाढल्याने याचा फटका शिक्षण क्षेत्राला बसला. इयत्ता नववी ते बारावीचा अपवाद वगळता उर्वरीत शाळेतील शिक्षण अद्याप सुरू झाले नाही. कोरोनामुळे २०२० या वर्षात चित्रकला विषयातील इंटरमिजिएट परीक्षादेखील घेण्यात आली नाही. सातवी ते दहावीचे विद्यार्थी इंटरमिजिएट परीक्षेसाठी पात्र असून, या परीक्षेतील प्राविण्य श्रेणीनुसार दहावीच्या निकालात सवलतीचे वाढीव गुण समाविष्ठ केले जातात. सवलतीचे वाढीव गुण देण्याबाबत राज्यातील परीक्षा मंडळांनी १५ जानेवारीपर्यंत प्रस्ताव मागविले आहेत. या वाढीव गुणांसाठी एलिमेंटरी व इंटरमिजिएट या दोन्ही परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. कोरोनामुळे सन २०२० मध्ये इंटरमिजिएट परीक्षा झाली नाही. तसेच सन २०१९ मधील ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र वाशिमसह राज्यातील अनेक शाळेत पोहचले नसल्याने विहित मुदतीत प्रस्ताव सादर करावे कसे? असा पेच विद्यार्थ्यांसह कला शिक्षकांना पडला आहे. विहित मुदतीत प्रस्ताव सादर करू न शकणाºया विद्यार्थ्यांना वाढीव गुणांना मुकावे लागणार आहे.
महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाचा पाठपुरावा
सवलतीच्या वाढीव गुणांपासून विद्यार्थी वंचित राहू नये म्हणून प्रस्ताव सादर करण्याची मुदत वाढवून द्यावी, सन २०१८ व २०१९ मधील ग्रेड परीक्षेचे प्रमाणपत्र सर्व शाळांपर्यंत पोहचविण्यात यावे, इंटरमिजिएट परीक्षा तातडीने घेण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कलाध्यापक संघाने महाराष्ट्र राज्य माध्यमिक, उच्च माध्यमिक शालांत परीक्षा मंडळाकडे केली आहे.