सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:30 AM2021-06-01T04:30:54+5:302021-06-01T04:30:54+5:30

वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच अर्थात ३६३ ...

Tenth result of all schools is one hundred percent! | सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के !

सर्व शाळांचा दहावीचा निकाल शंभर टक्के !

Next

वाशिम : कोरोनामुळे यंदा दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतलेला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच अर्थात ३६३ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला असून, आता पुढील प्रवेशाकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागून आहे.

कोरोनामुळे गत दीड वर्षांपासून शिक्षण क्षेत्र प्रभावित झाले आहे. गतवर्षी पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द केल्या होत्या. यंदाही पहिली ते नववीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. कोरोना विषाणू संसर्गाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सीबीएसई बोर्डाने इयत्ता दहावीची परीक्षादेखील रद्द केली. याच धर्तीवर राज्याच्या शालेय शिक्षण विभागानेदेखील दहावीची बोर्डाची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय जाहीर आहे. त्यानुसार दहावीची परीक्षा रद्द झाली. जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा एकूण ३६३ आहेत. यामध्ये एकूण १९,७१५ विद्यार्थी आहेत. दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याने जिल्ह्यातील सरसकट १९,७१५ विद्यार्थी पास झाले आहेत. शिक्षण विभागाने मूल्यमापनाचे धोरण जाहीर केले आहे. त्यानुसार दहावीच्या निकालासाठी १०० टक्के गुणांपैकी ५० टक्के अंतर्गत मूल्यमापनानुसार, तर ५० टक्के गुण नववीच्या अंतिम परीक्षेच्या गुणानुसार देण्यात येतील.

००००००००००००

बॉक्स

असे असेल नवे सूत्र

नववीतील गुणांचे ५० टक्के आणि दहावीतील अंतर्गत मूल्यमापन गुणांचे ५० टक्के वापरून दहावीचा अंतिम निकाल जाहीर केला जाणार आहे. दहावीतील अंतर्गत मूल्यमापन करताना विद्यार्थ्यांचे दहावीच्या वर्षभरातील अंतर्गत लेखी मूल्यमापनाला ३० गुण, तर गृहपाठ / तोंडी परीक्षा / प्रात्यक्षिक परीक्षा यांच्या आधारे २० गुण दिले जाणार आहेत.

०००००

विद्यार्थी खूश !

कोरोनामुळे यंदा दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करण्यात आली आहे. त्यामुळे बहुतांश विद्यार्थी खूश असल्याचे दिसून येते, तर काही विद्यार्थी मात्र या निर्णयावर नाखूश असल्याचे दिसून येते. पुढील प्रवेश नेमके कोणत्या आधारावर होतील, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे. कोरोनाकाळात दहावीच्या परीक्षा रद्द झाल्याचा आनंद आहेच; पण पुढील प्रवेशाचे काय? हा प्रश्नही कायम असल्याचे विद्यार्थिनी संतोषी चव्हाण, शुभम कुचेकर यांनी सांगितले.

००००००

पुढील प्रवेश प्रक्रियेची चिंता

कोरोनामुळे दहावीची परीक्षा रद्द झाली आहे. मात्र, दहावीनंतर आयटीआय, पॉलिटेक्निक यासह अन्य शाखेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया नेमकी कशी राहील, याबाबत थोडाफार संभ्रम आहे.

- माणिकराव इंगळे, पालक

००००

कोरोनाकाळात परीक्षा घेणे, हा प्रकार धोकादायकही ठरला असता. परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता पुढील प्रवेश प्रक्रिया नेमकी कशी राहणार? याकडे लक्ष आहे.

- बाबुराव वानखडे, पालक

००००००

बॉक्स

पुढील प्रवेशाचे काय होणार?

दहावीच्या मूल्यांकनाचा तिढा सुटल्यानंतर अकरावी प्रवेशासाठी राज्यभरात एकच सीईटी घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दरम्यान, ही सीईटी पूर्णपणे ऐच्छिक असून, दहावीच्या अभ्यासक्रमावर आधारित असेल. याप्रमाणेच आयटीआय, पॉलिटेक्निक यासह अन्य शाखेत प्रवेश घेण्यासाठी सीईटी राहील, असा अंदाज आहे. याचे स्वरूप वस्तुनिष्ठ बहुपर्यायी तसेच १०० गुणांचे राहू शकते.

००००

बॉक्स

सीईटीनुसार प्रवेश मिळण्याचा अंदाज

कोट

कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय शिक्षण विभागाला घ्यावा लागला. गुणांकनाचे सूत्रही शिक्षण विभागाने जाहीर केले. दहावीनंतरचे पुढील प्रवेश हे सीईटीनुसारच होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे दहावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही.

- गजानन डाबेराव, शिक्षणतज्ज्ञ.

........

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी परीक्षा रद्द करण्याचा निर्णय चांगलाच म्हणावा लागेल. पुढील प्रवेश हे सीईटी आधारे झाल्यास दहावीतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळेल. सीईटी नेमकी कोणत्या स्वरुपाची असेल, हे लवकर निश्चित झाले तर विद्यार्थ्यांना अभ्यास करणे सुलभ होईल.

- दीपक अवचार, शिक्षणतज्ज्ञ

....

अखेर दहावी बोर्डाची परीक्षा रद्द करून मूल्यमापनाचे सूत्र शिक्षण विभागाने जाहीर केले आहे. मूल्यमापनानुसार गुणांकन होईल. गुणांकन आणि सीईटीद्वारे पुढील प्रवेश होतील, असा अंदाज आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी अभ्यासात खंड पडू न देता सातत्य ठेवणे केव्हीही चांगलेच राहील.

- विलास खोरणे, शिक्षणतज्ज्ञ

००००

जिल्ह्यातील दहावीचे एकूण विद्यार्थी - १९,७१५

मुलगे १०,८४३

मुली ८,८७२

००००००

Web Title: Tenth result of all schools is one hundred percent!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.