दैनंदिन १३०० कोरोना चाचण्या करा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:17 AM2021-03-04T05:17:29+5:302021-03-04T05:17:29+5:30
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि कोरोना लसीकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा ...
जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आणि कोरोना लसीकरणाबाबत आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, उपजिल्हाधिकारी संदीप महाजन, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. म्हणाले, अमरावती जिल्ह्याच्या शेजारी कारंजा तालुका असल्यामुळे या तालुक्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. एका रुग्णामागे संपर्कात आलेल्या २० व्यक्तींच्या चाचण्या करण्यात याव्यात. जास्तीतजास्त बाधित रुग्णांचा शोध व्हावा, यासाठी दररोज १३०० पेक्षा अधिक चाचण्या कराव्यात. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ज्या-ज्या क्षेत्रासाठी ज्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत, त्यांनी त्यांची जबाबदारी चोखपणे पार पाडावी. अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही जिल्हाधिकाऱ्यांनी दिला. ज्येष्ठ, अतिजोखीम गटातील नागरिकांसाठी कोरोना लसीकरण मोहिमेला सुरुवात झाली असून, सर्वांचे व्यवस्थित लसीकरण झाले पाहिजे, याबाबत दक्षता घ्यावी. लसीकरणाचा प्रोटोकॉल पाळण्यात यावा, असे त्यांनी या वेळी सांगितले. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. आहेर यांनी लसीकरण नोंदणी प्रक्रियेविषयी माहिती दिली. रविवारी लसीकरण बंद राहणार असून, लसीकरणासाठी निवड केलेल्या खासगी रुग्णालयांमध्ये ‘आरोग्य मित्र’ मदतीसाठी उपलब्ध राहणार असल्याचे डॉ. आहेर यांनी सांगितले.
००००००००
कामगारांची कोरोना चाचणी बंधनकारक
जिल्ह्यातील नगरपालिका क्षेत्रातील सर्व आस्थापना मालकांची तसेच तेथे काम करणाऱ्या कामगारांची कोरोना चाचणी बंधनकारक करावी, अशा सूचनाही जिल्हाधिकारी शण्मुगराजन एस. यांनी दिल्या. कोणीही कोरोना आजार लपविणार नाही, याची खात्री नगरपालिकांनी करावी. शहरी भागातील विविध क्षेत्रांत कोरोना चाचणीचे शिबिर आयोजित करावे, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.