कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:43 AM2021-05-11T04:43:24+5:302021-05-11T04:43:24+5:30
उंबर्डाबाजार येथे गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजनांची गावात अंमलबजावणी सुरू केली ...
उंबर्डाबाजार येथे गेल्या काही दिवसांत कोरोना विषाणूचे प्रमाण वाढले आहे. त्याअनुषंगाने आरोग्य विभागाने प्रभावी उपाययोजनांची गावात अंमलबजावणी सुरू केली आहे. उंबर्डाबाजार आरोग्यवर्धिनी केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस. आर. नांदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण चमू कोरोनाकाळात गावकऱ्यांची विशेष काळजी घेत आहे. प्रभागनिहाय कार्यक्रम आखून प्रत्येक कुटुंबातील सदस्यांची आरोग्य तपासणी करणे, ताप मोजणे तथा ऑक्सिजन पातळी तपासण्यात येत असून, कोरोनाव्यतिरिक्त इतर कुठला आजार असल्यास त्याबाबतही समुपदेशन करून जनजागृती करण्यात येत असल्याने गावकऱ्यांमधून समाधान व्यक्त होत आहे. कोरोनाविषयक नियमावलीचे पालन करून आरोग्य विभागाकडून सर्वतोपरी मदत करण्यात येत आहे.
यापूर्वी कोरोनाबाधितांच्या संपर्कातील व्यक्ती पळवाटा शोधून चाचणी करून घेण्यास टाळाटाळ करत होते; मात्र वैद्यकीय अधिकारी डाॅ. नांदे यांनी आता कोरोना चाचणी अहवाल पाॅझिटिव्ह आल्यानंतर तत्काळ बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींच्या चाचणीवर विशेष भर दिल्याने गाव हळूहळू का होईना सुरक्षित होत असल्याचे बोलले जात आहे. गावकऱ्यांमध्येही याप्रति समाधान व्यक्त होत आहे.