चाचण्या ८,९४९; बाधित आढळले केवळ ४०
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:45 AM2021-08-24T04:45:55+5:302021-08-24T04:45:55+5:30
जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यापासून कोरोना संकटाचा शिरकाव झाला. फेब्रुवारी २०२१ पर्यंत संसर्गाची ही पहिली लाट कायम राहिली. तोपर्यंत ...
जिल्ह्यात एप्रिल २०२० या महिन्यापासून कोरोना संकटाचा शिरकाव झाला. फेब्रुवारी २०२१ पर्यंत संसर्गाची ही पहिली लाट कायम राहिली. तोपर्यंत कोरोनाबाधितांचा एकूण आकडा ७ हजारांच्या आसपास होता; मात्र त्यानंतर आलेल्या दुसऱ्या लाटेने जिल्हाभरात हाहाकार माजविला आणि पाहतापाहता बाधितांच्या आकड्याने जुलैअखेरपर्यंत ४१ हजारांचा आकडा पार केला. यादरम्यानच्या काळात संसर्गाने बाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाने खासगी रुग्णालये अधिग्रहित करून त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरू केले. दुसरीकडे आरटीपीसीआर आणि अँटिजन चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली.
‘ऑक्सिजन’, ‘व्हेंटिलेटर’वर ठेवाव्या लागणाऱ्या रुग्णांकडे विशेष लक्ष पुरविण्यात आले. त्याचा अपेक्षित फलश्रुती दिसायला लागली असून ऑगस्ट महिन्यात कोरोनाबाधितांच्या रुग्णसंख्येने नीचांकी पातळी गाठली आहे. गत २२ दिवसांत केवळ ४० बाधित रुग्ण आढळले. विशेष म्हणजे बाधितांमध्ये कोरोनाची विशेष लक्षणे नसल्याने ते ‘होम क्वारंटाइन’ असून रुग्णालयात आजमितीस एकही रुग्ण उपचारार्थ दाखल नाही, अशी माहिती आरोग्य विभागाकडून प्राप्त झाली.
....................
चालू महिन्यातील चित्र
१ ते ७ ऑगस्ट - ३६४२/१५
८ ते १४ ऑगस्ट - ३४४०/११
१५ ते २२ ऑगस्ट - २५०७/१४
झालेल्या चाचण्या / आढळलेले बाधित रुग्ण
.............
बाॅक्स :
तिसऱ्या लाटेसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज
कोरोनाची दुसरी लाट आता नियंत्रणात आहे; मात्र यासोबतच तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यानुषंगाने आरोग्य विभाग सर्व तयारीनिशी सज्ज असून ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड पुरेशा प्रमाणात तयार ठेवण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ. मधुकर राठोड यांनी दिली.