महा अवयवदान अभियानाची जनजागृती थंडावली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 01:19 AM2017-09-25T01:19:08+5:302017-09-25T01:19:22+5:30
वाशिम : राज्यभरात अवयवदान चळवळीला गती मिळावी, यासाठी शासन स्तरावरून ‘महा अवयवदान अभियान २0१७’ची मुहूर्तमेढ रोवण्यात आली. मात्र, यासंदर्भातील जनजागृती केवळ धार्मिक उत्सवांमध्येच होताना दिसून येत असून, गठित करण्यात आलेल्या विविध समित्यांचे कार्यदेखील थंडावल्यामुळे अभियानाचा अपेक्षित प्रचार-प्रसार होणे कठीण झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

महा अवयवदान अभियानाबाबत १८ ऑगस्ट २0१७ रोजी अमरावती विभागीय महसूल आयुक्तांनी जिल्हा समित्यांसोबत ‘व्ही.सी.’व्दारे चर्चा करून अभियानाला गती देण्यासंदर्भात चोख नियोजन केले होते. त्यानंतर २३ ऑगस्ट रोजी प्रत्येक जिल्ह्यातील जिल्हाधिकार्यांनीही जिल्हा समिती आणि तालुकाध्यक्षांसमवेत या अभियानाच्या अंमलबजावणीचे जिल्हा स्तरावरील नियोजन केले. मात्र, अभियानाची प्रभावी जनजागृती आणि चोख अंमलबजावणीबाबत प्रशासनाने अद्याप विशेष पुढाकार घेतलेला नाही. म्हणायला, गणेशोत्सवादरम्यान बोटावर मोजण्याइतपत गणेशोत्सव मंडळांनी चार-दोन बॅनर लावून अभियानाची जनजागृती करण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. मात्र, तो निश्चितपणे पुरेसा नसल्याचे मत सुज्ञ नागरिकांमधून व्यक्त होत आहे.
गणेशोत्सवामध्ये महा अवयवदानासंबंधी जनजागृती करण्याचे शासनाचे निर्देश होते. त्यानुसार, काही गणेश मंडळांना हाताशी धरून चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धेच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. त्यानंतर मात्र शासनाकडून जनजागृतीबाबत कुठलेच ठोस निर्देश प्राप्त झालेले नाहीत. त्यामुळे जनजागृती थंडावली आहे.
- जनार्दन जांभरूणकर
निवासी वैद्यकीय अधिकारी, वाशिम