मुलापाठोपाठ वडिलांचाही मृतदेह विहिरीत आढळला; पोलिसही चक्रावले
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2022 03:40 PM2022-02-15T15:40:40+5:302022-02-15T15:41:02+5:30
वाशिम- रविवारी सायंकाळच्या सुमारास शेलुबाजार परिसरातील एका विहिरीत महेश कालापाड या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मृतकाची आई कविता ...
वाशिम- रविवारी सायंकाळच्या सुमारास शेलुबाजार परिसरातील एका विहिरीत महेश कालापाड या मुलाचा मृतदेह आढळून आला होता. याप्रकरणी मृतकाची आई कविता महादेव कालापाड (२८) रा. शेंदूरजना मोरे ह.मु. शेलुबाजार यांनी रविवारी रात्री उशिरा पोलिसात फिर्याद दिली की, १२ फेब्रुवारी रोजी फिर्यादीचा पती महादेव कालापाड हा घरी आला व पत्नीसह मुलगा महेशला मारहाण केली. तसेच मुलाला घेऊन गेला. पतीनेच मुलाला विहिरीत फेकून जीवाने मारले, अशा तक्रारीवरून पोलिसांनी कलम ३०२ नुसार महादेव कालापाड याच्यावर गुन्हा दाखल केला.
दरम्यान, १४ फेब्रुवारी रोजी त्याच विहिरीत सकाळच्या सुमारास महादेव कालापाड यांचाही मृतदेह आढळून आला. यासंदर्भात मृतकाचा भाऊ गजानन कालापाड रा. शेंदूरजना मोरे यांनी तक्रार दिली की, सोमवारी सकाळी शेलुबाजारजवळील एका विहिरीत पुरुषाचा मृतदेह असल्याची माहिती मिळाली. त्या ठिकाणी गेलो असता मृतक हा महादेव कालापाड असल्याचे निष्पन्न आले. या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.
घरगुती वाद कारणीभूत
घरगुती वादातून दोन जणांना आपले प्राण गमवावे लागले, अशी चर्चा परिसरात आहे. पतीनेच मुलाला विहिरीत फेकून जीवाने मारले, अशी तक्रार पत्नी कविता कालापाड यांनी पोलिसात दिली. या तक्रारीच्या घटनेची शाई वाळत नाही; तेच सोमवारी सकाळच्या सुमारास महादेव कालापाड यांचाही मृतदेह आढळून आला.