खासगी रुग्णवाहिकेतून शहीद जवानाचे पार्थिव आणले; संतप्त नागरिकांनी ‘समृद्धी’वरच रास्ता रोको केला
By संतोष वानखडे | Published: September 13, 2023 04:53 PM2023-09-13T16:53:57+5:302023-09-13T16:55:03+5:30
शिरपूर येथील शहीद आकाश अढागळे हे लेह येथे सेवा बजावत असताना उंच पहाडीवरून पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते.
वाशिम : शिरपूर (ता.मालेगाव) येथील शहिद जवान आकाश अढागळे यांचे पार्थिव बुधवारी (दि.१३) नागपूर येथून खासगी रुग्णवाहिकेने समृद्धी महामार्गाने दुपारी १२ वाजताच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील वारंगी टोल नाका येथे आणण्यात आले. यावेळी प्रशासनाचे अधिकारी, लष्करी अधिकाऱ्यांची अनुपस्थिती व लहान खासगी रुग्णवाहिका पाहून संतप्त झालेल्या नागरिकांनी वारंगी टोल नाक्यावरच रास्ता रोको आंदोलन करीत नाराजी व्यक्त केली.
शिरपूर येथील शहीद आकाश अढागळे हे लेह येथे सेवा बजावत असताना उंच पहाडीवरून पडल्याने गंभीर दुखापत झाल्याने लष्करी रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान १० सप्टेंबर रोजी त्यांना वीर मरण प्राप्त झाले. त्यांचे पार्थिव दिल्लीच्या लष्करी मुख्यालयातून १२ सप्टेबर रोजी विमानाने नागपूरला आणले. नागपूर येथून समृद्धी महामार्गाने एका खासगी रुग्णवाहिकेने १३ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास मालेगाव तालुक्यातील वारंगी टोल नाका येथे पार्थिव आणण्यात आले. दरम्यान, वारंगी टोल नाका येथे प्रशासन किंवा सैनिक कल्याण विभागाचे अधिकारी उपस्थित नसल्याचे आणि खासगी रुग्णवाहिका पाहून आप्तस्वकियांसह जिल्हावासियांच्या भावना संतप्त झाल्या.
अगदी लहान वाहनातून पार्थिव आणल्याने नागरिकांनी प्रचंड रोष व्यक्त केला. वारंगी टोल नाक्यावरच नागरिकांनी तब्बल साडेचार तास ठिय्या आंदोलन केले. शहीद जवानाचे पार्थिव लष्करी वाहनातून शासकीय रीतिरिवाजानुसार आणले जावे, अशी मागणी नागरिकांनी केली. शेवटी ही मागणी मान्य झाल्याने नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन मागे घेतले. साडेचार तासानंतर समृद्धी महामार्गावरील वाहतूक पूर्ववत झाली.