मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण
By दिनेश पठाडे | Published: March 4, 2024 04:42 PM2024-03-04T16:42:17+5:302024-03-04T16:42:39+5:30
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमली वाशिम नगरी
वाशिम : शहरातील अकोला नाका येथे उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सोमवारी(दि.०४) रोजी पार पडले.
अनावरण सोहळ्यास छत्रपती संभाजीराजे, पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, रासपचे अध्यक्ष महादेव जानकर, खासदार भावना गवळी, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष चंद्रकांत ठाकरे, आमदार ॲड. किरण सरनाईक, गोपीकिशन बाजोरिया, जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस., जिल्हा पोलिस अधीक्षक अनुज तारे विविध पक्षांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थित होती.
दुपारी दीड वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे परिसरात आगमन होताच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव करण्यात आला. पारंपारिक वेशभूषेत असलेल्या रेखाताई विद्यालयाच्या विद्यार्थिंनीनी लिझीम च्या गजरात मान्यवरांचे स्वागत केले. यानंतर शिवरायांच्या अश्वारुढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्याचा साक्षीदार होण्यासाठी शेकडो नागरिकांनी गर्दी केली होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय असो, तुमचं आमचं नातं काय, जय जिजाऊ जय शिवराय, अशा घोषणेने वाशिम शहर दुमदुमून गेले.