आठवडाभरातच मिळाली दगावलेल्या मेंढ्यांची नुकसान भरपाई, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतली दखल
By नंदकिशोर नारे | Published: December 5, 2023 04:34 PM2023-12-05T16:34:38+5:302023-12-05T16:35:23+5:30
जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या उत्तररात्रीपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले.
वाशिम : जिल्ह्यात मागील आठवड्यात अवकाळी पावसासह अनेक भागांत गारपिट झाली होती. विविध ठिकाणी मुक्कामी असलेल्या मेंढपाळांच्या शंभरपेक्षा अधिक मेंढ्या या नैसर्गिक आपत्तीमुळे दगावल्या. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दखल घेत संबंधित तहसीस्तरावर याबाबत आवश्यक कार्यवाहीच्या सुचना दिल्या. त्यामुळे मेंढपाळांना आठवडाभरातच मदत मंजूर झाली असून, काहींना मदतीचे धनादेशही वितरीत करण्यात आले आहेत.
जिल्ह्यात २६ नोव्हेंबरच्या उत्तररात्रीपासून अवकाळी पाऊस आणि गारपिटीने थैमान घातले. या नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप, रब्बी आणि भाजीपाला पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. शिवाय विविध ठिकाणी मेंढ्या चारण्यासाठी मुक्कामी असलेल्या मेंढपाळांच्या शंभराहून अधिक मेंढ्याही दगावल्या. या नुकसानापोटी आठवडाभरातच नुकसानग्रस्त मेंढपाळांना मदत मंजूर झाली असून, या मदतीचे धनादेशही मेंढपाळांना वितरीत करण्यात आले. मंगरुळपीर तालुक्यातील कोठारी येथे मुक्कामी असलेले मेंढपाळ अरूण कोळकर यांच्या ८ मेंढ्या दगावल्या होत्या, तर ३३ मेंढ्या गहाळ होत्या.
यातील दगावलेल्या मेंढ्यांसाठी शासकीय दराप्रमाणे प्रती चार हजार मेंढी या प्रमाणे एकूण ३२ हजारांचा धनादेश अरूण कोळकर यांना मंगरुळपीर तहसीलदारांकडून अदा करण्यात आला आहे. कारंजा तालुक्यातील शिवनगर येथील बबन कोळकर यांच्या सहा मेंढ्या दगावल्या होत्या. त्यांना ३६ हजार रुपयांचा धनादेश वितरीत करण्यात आला, तर भडशिवणी येथील प्रभाकर कोळकर यांच्या सहा मेंढ्या दगावल्या होत्या. त्यापैकी तीन मेंढ्यांचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झाला. त्यानुसार प्रभाकर कोळकर यांना तीन मेंढ्यांसाठी एकूण १२ हजार रुपयांचा धनादेश कारंजा तहसीललदारांकडून देण्यात आला.
कारंजा तालुक्यात अवकाळी पावसाच्या तडाख्याने १० मेंढ्या दगावल्याचा अहवाल तलाठ्यांकडून प्राप्त झाला होता. पशूधन विकास अधिकाऱ्यांच्या शवविच्छेदन अहवालाच्या आधारे नऊ मेंढ्यांसाठी प्रत्येकी ४ हजार रुपये प्रमाणे ३६ हजारांची मदत मेंढपाळांना वितरीत करण्यात आली आहे.
- कुणाल झाल्टे,
तहसीलदार, कारंजा