दिव्यांगांना लाभ मिळणार ‘ऑन दी स्पाॅट’! ३५ यंत्रणा एका छताखाली
By सुनील काकडे | Published: September 30, 2023 01:34 PM2023-09-30T13:34:55+5:302023-09-30T13:35:09+5:30
तक्रारींचा होणार जागीच निपटारा, विविध स्वरूपातील शारिरीक व्यंग असणाऱ्या व्यक्ती विभागीय स्तरावर पोहचून तक्रार मांडू शकत नाही.
वाशिम : दिव्यांग बांधवांच्या विविध स्वरूपातील तक्रारी, समस्यांचा निपटारा करण्यासाठी ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’, ही महत्वाकांक्षी मोहीम राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने ४ ऑक्टोबर रोजी विशेष शिबीर होत असून ३५ प्रशासकीय यंत्रणा एका छताखाली येवून दिव्यांगांना ‘ऑन दी स्पाॅट’ लाभ देणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिली.
विविध स्वरूपातील शारिरीक व्यंग असणाऱ्या व्यक्ती विभागीय स्तरावर पोहचून तक्रार मांडू शकत नाही. त्यामुळे ते न्यायोचित हक्कापासून वंचित राहतात. शासकीय योजनांचा फायदा घेण्यास आवश्यक असणाऱ्या कागदपत्रांसह दिव्यांगत्वाचे यूडीआयडी प्रमाणपत्र, शेतजमिनीशी संबंधित कागदपत्रे, जात प्रमाणपत्र व अन्य आवश्यक प्रमाणपत्रे प्राप्त करण्यासाठी त्यांना वारंवार प्रशासकीय कार्यालयांच्या फेऱ्या मारणे अशक्य असते.
ही बाब लक्षात घेवून दिव्यांग कल्याण विभागाने स्वत:च दिव्यांगांच्या दारी जावून त्यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यानुसार, ४ ऑक्टोबर रोजी वाशिम येथील तिरूपती लाॅनमध्ये शिबीर आयोजित करण्यात आले आहे. त्यात ३५ प्रशासकीय यंत्रणा हजर राहून दिव्यांगांच्या अडचणींचा निपटारा करतील. सोबतच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देतील, अशी माहिती जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी दिली.