दंड भरला नाही, आता लोकअदालतीला हजर व्हा! दंडाची रक्कम न भरलेल्या वाहनचालकांना समन्स
By दिनेश पठाडे | Published: April 19, 2023 06:41 PM2023-04-19T18:41:28+5:302023-04-19T18:41:44+5:30
वाशिम शहर शाखेकडून लाखोंचा थकीत दंड वसूल करण्यासाठी २०० जणांना समन्स बजाविले आहेत.
वाशिम : वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर संबंधित वाहनचालकांवर ऑनलाइन दंड आकारण्यात येतो. ई-चालाननुसार आकारण्यात आलेला दंड भरण्याकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. अशांकडून रक्कम वसूल करण्यासाठी प्रकरणे लोकअदालतीत ठेवली जाणार आहेत. वाशिम शहर शाखेकडून लाखोंचा थकीत दंड वसूल करण्यासाठी २०० जणांना समन्स बजाविले आहेत.
प्रलंबित प्रकरणांचा निपटारा करण्यासाठी जिल्हा विधिसेवा प्राधिकरणच्या वतीने वेळोवेळी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन केले जाते. यामध्ये वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर दंडाची थकबाकी वसुली करण्यासाठी वाहतूक शाखेकडून प्रकरणे ठेवली जातात. दंड थकीत असलेल्या वाहनचालकांना दंड भरा नाहीतर लोकअदालतीत हजर राहा, याबाबत मोबाइलवर मेसेज पाठविला जात आहे.
वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांकडून कारवाई केली जाते. दंडाची रक्कम वाढत गेली; मात्र वसुली होत नसल्याने पोलिसांनी विशेष मोहीम राबविली. त्याआधारे थकीत दंड असलेल्यांना माहिती देण्यात आली. त्यानंतरही अनेकजण दंड भरण्यास तयार नाहीत. दंड भरत नसलेल्या वाहनचालकांना नोटिसा जारी करण्यात आल्या असून, ३० एप्रिल रोजी होणाऱ्या लोकअदालतीत हजर होऊन दंड भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
आपल्याला चुकीने चालान पाठविल्याच्याही काहींच्या तक्रारी असतात. त्यावर तोडगा काढण्याचा प्रयत्न होतो; तसेच थकीत दंड जास्तीत जास्त, लवकरात लवकर वसूल करण्यासाठी प्रयत्न लोकअदालतीच्या माध्यमातून होतात. प्रलंबित दंडाची रक्कम महाट्रॅफिक ॲपधून ऑनलाइन पद्धतीने अथवा वाशिम शहर वाहतूक शाखा कार्यालयात प्रत्यक्ष संपर्क साधून भरावी. दंडाची थकबाकी असलेल्या वाहनचालकांना नोटीस बजावून लोकअदालतीपूर्वी दंड भरण्याची मुभा देण्यात आली आहे. या मुदतीत दंड न भरल्यास अशांना लोकअदालतीत हजर राहावे लागणार आहे. त्या ठिकाणी तोडगा न निघाल्यास न्यायालयाच्या आदेशान्वये पुढील कारवाई केली जाणार आहे.