पहिली घंटा वाजली; शाळेत पुन्हा किलबिलाट! ZP शाळेत पुस्तके मिळाली; गणवेश 'वेटींग'वर
By संतोष वानखडे | Published: July 1, 2024 08:31 PM2024-07-01T20:31:25+5:302024-07-01T20:31:56+5:30
नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत, उपस्थित विद्यार्थ्यांना पहिल्याच दिवशी मिळाली मोफत पुस्तके, ‘सेल्फी पाॅईंट’ ठरले लक्षवेधक
वाशिम : उन्हाळ्यातील दीर्घ सुट्टीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी, अनुदानित शाळांची पहिली घंटा सोमवार, १ जुलै रोजी वाजली. शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले असून, पुन्हा किलबिलाट सुरू झाला. वार्षिक परीक्षेनंतर उन्हाळी सुटीत विद्यार्थी हे जवळपास अडीच महिने घरीच होते. दरवर्षी विदर्भातील शाळा २६ जूनपासून सुरू होतात. यंदा उष्णतेचा पारा चांगलाच तापल्याने १ जुलैपासून वाशिमसह विदर्भातील शाळा सुरू होतील, असा निर्णय शिक्षण विभागाने घेतला होता. त्यानुसार १ जुलै रोजी जिल्ह्यातील शाळांची पहिली घंटा वाजली असून, विद्यार्थ्यांचे मोठ्या थाटामाटात शाळेत आगमन झाले.
शाळा प्रशासनानेदेखील पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांना सुखद धक्का देत अनोख्या पद्धतीने स्वागत केले. कोणी सेल्फी पाॅईंट उभारला तर कोणी गुलाबपुष्प देवून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. शाळेच्या पहिल्या दिवसाचा आनंद नियमित विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरून ओसंडून वाहत असल्याचे दिसून आले तर नर्सरी, पहिलीतील बहुतांश नवागत विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मात्र भितीचे सावट, धाकधूक पाहावयास मिळाली. कोणी रडत-रडत आले तर कोणी हसत-हसत शाळेत एन्ट्री केली.
जिल्हा परिषद शाळेत पुस्तके मिळाली; गणवेश वेटींगवर
विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, पाठ्यपुस्तकांपासून कुणीही वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून समग्र शिक्षा अभियानातून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण करण्यात आले. शाळेच्या पहिल्या दिवशी उपस्थित असलेल्या विद्यार्थ्यांना मोफत पुस्तके देण्यात आली. दुसरीकडे शासनस्तरावरून शालेय गणवेशास विलंब झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना जि.प. शाळेच्या पहिल्या दिवशी गणवेश मिळू शकला नाही. परिणामी, जुन्याच गणवेशावर विद्यार्थ्यांना शाळेत यावे लागले. शालेय गणवेश कधी मिळणार? याकडे ग्रामीण विद्यार्थ्यांचे लक्ष लागून आहे.