उद्या वाजणार शाळेची पहिली घंटा; थाटात होणार विद्यार्थ्यांचा प्रवेश!
By संतोष वानखडे | Published: June 30, 2024 08:38 PM2024-06-30T20:38:39+5:302024-06-30T20:39:38+5:30
वाशिम : उन्हाळ्यातील दीर्घ सुट्टीनंतर वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी, अनुदानित शाळांची पहिली घंटा सोमवार, १ जुलै रोजी ...
वाशिम: उन्हाळ्यातील दीर्घ सुट्टीनंतर वाशिम जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी, अनुदानित शाळांची पहिली घंटा सोमवार, १ जुलै रोजी वाजणार आहे. पहिल्याच दिवशी शाळा प्रवेशोत्सवाच्या वेळी पुष्प देऊन विद्यार्थ्यांचे स्वागत करण्याचे नियोजन शाळा प्रशासन व शिक्षण विभागाने केले.
जिल्ह्यात स्थानिक स्वराज्य संस्थेसह खासगी संस्थेच्या एकूण १३७९ शाळा आहेत. सर्व माध्यमाच्या प्राथमिक शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठव्या वर्गात जवळपास १.६८ लाख विद्यार्थ्यांची संख्या आहे. विद्यार्थ्यांची १०० टक्के उपस्थिती टिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे, पाठ्यपुस्तकांपासून कुणीही वंचित राहू नये, पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून समग्र शिक्षा अभियानातून शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा व अनुदानित शाळांमधील इयत्ता पहिले ते आठवीतील सर्व माध्यमाच्या विद्यार्थ्यांना पहिल्या दिवशी मोफत पाठ्यपुस्तकाचे वितरण केले जाणार आहे. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांमध्ये उत्साह आणि आनंददायी वातावरण निर्मिती व्हावी या अनुषंगाने प्रत्येक शाळेमध्ये नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याचे नियोजन शिक्षण विभागाने केले आहे. विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी शाळा प्रशासनही सज्ज झाले आहे.
१.१६ लाख विद्यार्थ्यांना मिळणार पुस्तके
जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांमध्ये शैक्षणिक वर्षे २०२४-२५ मध्ये पहिली ते आठवीची १ लाख १६ हजार २३२ एवढी प्रस्तावित विद्यार्थी संख्या आहे. त्यात वाढ अपेक्षित धरुन १.१९ लाख पुस्तकांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार जिल्ह्याला पाठ्यपुस्तके प्राप्त झालेली असून, संबंधित शाळांकडे यापूर्वीच रवाना देखील करण्यात आली. शाळेच्या पहिल्याच दिवशी उपस्थित विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके दिली जाणार आहेत.
एक बूट, दोन मोजे मिळणार
स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, अनुदानित प्राथमिक शाळेच्या पहिली ते आठव्या वर्गातील पात्र विद्यार्थ्यांच्या एक बूट व दोन मोजे यासाठी शिक्षण विभागाकडून संबंधित शाळांकडे निधी वर्ग करण्यात आला. ज्या शाळांनी बूट व मोजे घेतले असतील, त्या शाळेत पहिल्याच दिवशी पात्र विद्यार्थ्यांना बूट व दोन मोजे मिळणार आहेत.
१ जुलैपासून जिल्ह्यात शाळा सुरू होणार असून, नवागत विद्यार्थ्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्याचे नियोजन करण्याच्या सूचना शाळांना दिल्या. पात्र विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकेदेखील देण्यात येणार आहेत.
- गजानन डाबेराव
उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक), वाशिम